नवशिक्यांना मनसेची पसंती
By Admin | Updated: September 26, 2014 00:56 IST2014-09-26T00:56:44+5:302014-09-26T00:56:44+5:30
एकीकडे आघाडी आणि युतीचे भिजत घोंगडे असतांनाच मनसेने मात्र पहिली यादी जाहिर केली आहे. यामध्ये कल्याण पश्चिममधून अपेक्षेप्रमाणेच प्रकाश भोईर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे

नवशिक्यांना मनसेची पसंती
जितेंद्र कालेकर, ठाणे
एकीकडे आघाडी आणि युतीचे भिजत घोंगडे असतांनाच मनसेने मात्र पहिली यादी जाहिर केली आहे. यामध्ये कल्याण पश्चिममधून अपेक्षेप्रमाणेच प्रकाश भोईर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. गेल्या वेळी पराभूत झालेले सुधाकर चव्हाण यांना ओवळा माजीवडयातून तर दशरथ पाटील भिवंडी ग्रामीणमधून आणि ज्ञानेश्वर तमळपाडे यांना शहापूरमधून पुन्हा संधी मिळाली आहे.
चव्हाण आणि पाटील यांना गेल्या वेळी थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. शिक्षक असलेल्या पाटील यांनी गेल्या वेळी त्यांचेच बंधू राष्ट्रवादीच्या शांताराम पाटील आणि विष्णु सवरा यांच्याबरोबर लढत दिली होती. सवरा यांनी आता भिवंडी ग्रामीण ऐवजी विक्रमगड हा मतदारसंघ निवडला आहे. त्यामुळे यावेळीही शांताराम आणि दशरथ या दोन्ही भावांमध्ये लढत होणार आहे. तर विक्रमगडमधून भरत हजारे, नालासोपारामधून विजय मांडवकर, कल्याण पूर्व मधून नितिन निकम आणि बेलापूरमधून गजानन काळे या नविन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ भोईर याच विद्यमान आमदाराला पुन्हा संधी मिळाली आहे. वर्षभरापूर्वीच मनसेत आलेल्या डॉक्टर विकास कांबळी यांना अंबरनाथमधून संधी दिली आहे.