Join us  

मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 10:03 PM

राज्यभरातून अनेक मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुनच आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती.

राज्यभरातून अनेक मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुनच आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'तुम्हाला या ना त्या मार्गाने आम्ही दाबू' हे मनसेच्या नेत्यांची धरपकड करून सरकारने दाखवायचं आहे का? तुम्हाला दिलेली सत्ता ही वर्चस्व गाजवण्यासाठी दिली आहे की जनतेच्या सेवेसाठी?, असा सवालही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. 

मनसेच्या आंदोलनाबाबत आणि पुढील माहिती देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात आज मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरही राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेतून भाष्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकर न लावणाऱ्या मौलवींचे आभार मानले. जवळपास ९०-९२ टक्के ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन. आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत १ हजार १४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींमध्ये सकाळची अजान ५च्या आत वाजवली गेली. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता ज्या १३५ मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला. 

टॅग्स :प्रवीण दरेकरराज ठाकरेमहाराष्ट्र सरकार