Join us  

"ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय..." अभूतपूर्व यशानंतर मनसेने दिली प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: January 19, 2021 8:36 AM

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर भाजपा नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीनेच बाजी मारल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं आहे.

मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसतंय. कारण मनसेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. ३५ ग्रामपंचायतीमध्ये मनसेने विजयी पताका फडकवलेली आहे. 

सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुलनेत मनसेने कमी जागा पटकावल्या असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेकडूनही आता प्रतिक्रिया आली आहे. 

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी फेसबुकद्वारे निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केले आहे. अनिल शिदोरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं. लोकशाहीचं खरं रूप भेटल्याचा आनंद होतो, अशी भावना अनिल शिदोरे यांनी व्यक्त केली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं.

परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी...

Posted by Anil Shidore on Monday, 18 January 2021

तत्पूर्वी, मनसेने एकट्या यवतमाळमध्ये १५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. याठिकाणी ९ पैकी ७ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने ७ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत.  रायगडच्या जोहे येथे मनसेचा १ उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. अजूनही राज्यात ठिकठिकाणी मनसेप्रणित आघाडीचे उमेदवार जिंकल्याची माहिती आहे.

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी ७ पैकी ५ जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे.

शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही- देवेंद्र फडणवीस

"राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे", असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास- आदित्य ठाकरे

ग्रामपंचायतीच्या निकालांवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शहरांपासून गावांपर्यंत लोकांचा या सरकारवर विश्वास आहे. कोराना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेग्राम पंचायतनिवडणूकमहाराष्ट्र