Join us  

...अन् अमित ठाकरेंनी थेट बैलगाडीच चालवली; त्यांच्या वेगळ्या अंदाजाने मनसैनिकही भारावले

By मुकेश चव्हाण | Published: February 03, 2021 8:50 PM

अमित ठाकरे पुण्यातील खेड तालुक्यातील सावरदरी या ठिकाणी मनसेच्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनासाठी गेले होते.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कंबर कसली आहे. कल्याण-डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम केल्यानंतर आज 'कृष्णकुंज'वर खलबतं झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. राज ठाकरे यांनी या बैठकीत मनसेच्या नेत्यांना महापालिका निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी दिली आहे. 

विशेष म्हणजे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावरही मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची जबाबदारी देण्यात आली आहे.अमित ठाकरे यांच्याकडे मुंबईतील उत्तर पूर्व मतदार संघातील वॉर्डांची जबाबदारी असणार आहे. अमित ठाकरे यांच्यासोबतीले मनसेचे नेते संदीप देशपांडे असणार आहेत. मुंबईच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील सर्व वॉर्डातील प्रचाराची आणि निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे असणार आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर दिवसभर अमित ठाकरे यांची सोशल मीडियावर चर्चा होती. तसेच मनसे कार्यकर्ते देखील या निर्णयाने आनंदी असल्यचे दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान अमित ठाकरे यांच्या एका वेगळ्या अंदाजामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

अमित ठाकरे पुण्यातील खेड तालुक्यातील सावरदरी या ठिकाणी मनसेच्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनासाठी गेले होते. यादरम्यान अमित ठाकरे यांनी काही वेळ बैलगाडी चालवली. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तसेच अमित ठाकरेंनी बैलगाडी चालवल्याने उपस्थित असणारे कार्यकर्ते देखील भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. 

आमची माती, आमची माणसं! 👌👌

मनसे नेते श्री. अमित राजसाहेब ठाकरे ह्यांचे सावरदरी ता. खेड जि. पुणे येथील बैलगाडी चालवतानाचे हे अतिशय सुंदर छायाचित्रे!

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Wednesday, 3 February 2021

दरम्यान, अमित ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठीची जबाबदारी स्वीकारली आहे. अमित अत्यंत संयमी आहे. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला उत्तर पूर्वमध्ये चांगलं यश मिळेल. त्याची मेहनतीची संपूर्ण तयारी आहे", असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. 'कृ्ष्णकुंज'वर झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईप्रमाणे ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली यासाठी एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली जाणार आहे.

मनसेला कल्याण-डोंबिवलीत धक्का

मनसेला गेल्या दोन दिवसांत सलग दोन मोठे धक्के बसले आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसऱ्याच दिवशी मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मुंबईत 'कृष्णकुंज'वर मनसे नेत्यांची तातडीची बैठक राज ठाकरे यांनी घेतली. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षफुटीला आळा घालण्याचं आव्हान मनसेसमोर असणार आहे. 

टॅग्स :अमित ठाकरेराज ठाकरेमनसेमहाराष्ट्र