‘मनसे’ अखेर दादरमध्ये ‘रस्त्यावर’
By Admin | Updated: February 18, 2017 04:40 IST2017-02-18T04:40:27+5:302017-02-18T04:40:27+5:30
मतदानाला सामोरे जाण्यापूर्वी शेवटच्या प्रचारसभेच्या जागेवरून राजकीय पक्ष आमनेसामने आले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावरून

‘मनसे’ अखेर दादरमध्ये ‘रस्त्यावर’
मुंबई : मतदानाला सामोरे जाण्यापूर्वी शेवटच्या प्रचारसभेच्या जागेवरून राजकीय पक्ष आमनेसामने आले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावरून शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेला वाद मिटत नाही तोच आता दादरमध्ये प्रचारसभेवरून मनसे आणि शिवसेनेत वादावादी सुरू आहे.
प्रतिष्ठेच्या या प्रभागासाठी उभय पक्षांमध्ये आरपारची लढाई सुरू आहे. त्यामुळे मनसेची नाकाबंदी करण्याचे सर्व प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत. पक्षाची कोणतीही सभा नसताना येथील मैदानच शिवसेनेने बुक केल्यामुळे मनसेची गोची झाली आहे. अखेर दादर येथील कबुतरखान्याजवळ रस्त्यावर मनसेची प्रचारसभा उद्या होणार असल्याने या ठिकाणी उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
२०१२ च्या महापालिका निवडणुकीत मनसेने दादर-माहीम या बालेकिल्ल्यातूनच शिवसेनेला हद्दपार केले होते. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून या बालेकिल्ल्यात भगवा फडकावण्यासाठी शिवसेनेची चरफड सुरू आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघावर शिवसेनेने भगवा फडकवला. मात्र येथील सहा प्रभाग आजही मनसेकडे आहेत. (प्रतिनिधी)
जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार
जागेसाठी मनसेचा आज संध्याकाळपर्यंत पाठपुरावा सुरू होता. मात्र शिवसेनेने मैदान मनसेसाठी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे लोकशाही मार्गाने आता दादर कबुतरखान्याजवळ ही सभा होईल, असे मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. शिवसेनेकडून प्रतिक्रियेसाठी कोणीही उपलब्ध झाले नाही.
तणाव निर्माण होण्याची शक्यता
दादर प्रभागासाठी शिवसेना-मनसेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मैदान आधीच बुक करून मनसेच्या सभेत खो घालणे ही शिवसेनेची राजकीय खेळी आहे. मात्र मनसेनेही हे आव्हान स्वीकारत कबुतरखान्याजवळ रस्त्यावरच सभा घेण्याची तयारी केली आहे. यासाठी आवश्यक सर्व परवानगी घेण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले. मात्र कबुतरखाना येथील रस्ता वर्दळीचा व गजबजलेला असतो. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रचारसभेसाठी हा रस्ता बंद होणार. तसेच जागेवरून मनसैनिकांमध्ये राग आहेच, त्याचे रूपांतर शिवसैनिकांबरोबर हाणामारीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
असा आहे मतदारसंघ : दादर-माहीममध्ये ६० टक्के मतदार मराठी भाषिक असून २० टक्के मतदार गुजराती, जैन आणि मारवाडी आहेत. तर उर्वरित २० टक्के मुस्लीम, ख्रिश्चन आहेत. २०१२ मध्ये ४३.४० टक्के मतदान झाले होते. येथे पाच लाख २७ हजार मतदार आहेत.
माहीम कोळीवाडा प्रभाग क्रमांक १८२ मध्ये माजी महापौर मिलिंद वैद्य यांना शिवसेनेने मैदानात उतरवले आहे. तर मनसेने येथे राजन पारकर यांचे आव्हान शिवसेनेपुढे उभे केले आहे. भाजपाने येथे विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली आहे. आंबेकर यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
प्रभाग क्रमांक १९० मधून मनसेने विद्यमान नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांच्या पत्नी भारती तांडेल यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने शिवसेनेतून आलेले आमदार सुरेश गंभीर यांची मुलगी शीतल गंभीरला उतरवले आहे. या प्रभागात मराठीच नव्हे तर मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीय मतदारही आहेत. तर शिवसेनेने मनसेतून आलेले स्थानिक नेते प्रकाश पाटणकर यांच्या पत्नी प्रीती पाटणकर यांना या प्रभागात उमेदवारी दिली आहे.
प्रभाग क्रमांक १९२ मध्ये मनसेने सत्ता आपल्याच हाती राहण्यासाठी विद्यमान नगरसेवक सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांना उमेदवारी दिली आहे. स्नेहल या शिवसेनेतून मनसेत आल्या आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या जाधव यांचा पत्ता कापण्यात आल्यानंतर नाराज होऊन त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला होता.
शिवसेना-मनसे आमनेसामने
दादर-माहीम-शिवडी मतदारसंघात खरी लढत ही सेना आणि मनसेमध्येच आहे. मात्र या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्यासाठी भाजपा, काँग्रेसनेही मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेने प्रभाग क्रमांक १९१ मध्ये विशाखा राऊत यांना उतरवले आहे.
प्रभाग शिवसेना भाजप मनसे
१८२ (माहीम कोळीवाडा-खुला वर्ग) मिलिंद वैद्य -विलास आंबेकर-राजन पारकर
१९० (माहीम-इतर मागासवर्ग महिला) वैशाली पाटणकर -शीतल गंभीर-भारती तांडेल
१९१ (शिवाजी पार्क, महालक्ष्मी सिंधी कॉलनी -महिला आरक्षण) विशाखा राऊत- तेजस्विनी जाधव-स्वप्ना देशपांडे
१९२ (बाबासाहेब आंबेडकर नगर, कामगार क्रीडा केंद्र महिला आरक्षण) प्रीती पाटणकर-वैभवी भाटकर-स्नेहल जाधव