मनसेचे इंजिन निवडणुकीआधीच घसरले
By Admin | Updated: March 27, 2015 00:51 IST2015-03-27T00:51:38+5:302015-03-27T00:51:38+5:30
महापालिका निवडणूक लढविणार नाही. या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे पक्षातील इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला

मनसेचे इंजिन निवडणुकीआधीच घसरले
नवी मुंबई : महापालिका निवडणूक लढविणार नाही. या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे पक्षातील इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला असून त्यातील अनेक इच्छुक आता काँगे्रस, भाजपा, राष्ट्रवादीसह शिवसेनेची दारे ठोठावण्याचा तयारीत आहेत. यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या मनसेत पुन्हा फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक न लढविण्याच्या मनसेच्या निर्णयामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पक्षातील अनेक उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. श्रेष्ठींनीच पक्षाचे इंजिन रिव्हर्स घेतल्याने त्याचा परिणाम म्हणून पक्षातील अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अन्य पक्षांकडे चाचपणी सुरू केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला म्हणावा तसा करिष्मा दाखविता आला नाही. यातच या दोन्ही निवडणुकीनंतर पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली. स्थानिक नेतृत्वावर टीका करून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे श्रेष्ठींना सादर केले. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाकडून महापालिकेची निवडणूक लढण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र श्रेष्ठींनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. मनसे महापालिका निवडणूक लढणार नसल्याचे पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, याबाबतचा निर्णय वेळेनुसार जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर नवी मुंबईतून त्यांच्यासोबत तत्कालीन नगरसेवक जितेंद्र कांबळी यांच्यासह पांडुरंग गोरडे, सुकुमार किल्लेदार, रतन मांडवे, किशोर शेवाळे, आनंद चौगुले ही मंडळी गेली होती. यानंतर ऐरोलीतील लघुउद्योजक के. आर. गोपी यांनीही मनसेची कास धरली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूरमधून पप्पू महाले यांनी लक्षवेधी मते घेतली. तर कामगार क्षेत्रात गोरडे यांनी एनएमएमटीमध्ये पक्षाची युनियन सक्षम बनविली होती.
मात्र राज ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे पक्षात दुही माजून अनेक कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेत गेले. यात जितेंद्र कांबळी, किशोर शेवाळे, सुकुमार किल्लेदार,रतन मांडवे यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. यापैकी मांडवे शिवसेनेच्या तिकिटावर गत निवडणुकीत नगरसेवकही झाले.
या पडझडीनंतर गजानन काळे, संदीप गलगुडे, गजानन खबाले, दत्ता घंगाळे यांनी पक्ष रुजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवळपास ५० ते ६० प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. परंतु श्रेष्ठींनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांचा हिरमोड झाला.