राणीबाग मैदान वाचवण्यासाठी मनसेची निदर्शने

By Admin | Updated: December 15, 2014 00:59 IST2014-12-15T00:59:27+5:302014-12-15T00:59:27+5:30

भायखळा येथील राणीबागेतील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारित कलादालनासाठी स्थानिक खेळाचे मैदान बळकावले

MNS 'demonstrations to save the Ranibagh ground | राणीबाग मैदान वाचवण्यासाठी मनसेची निदर्शने

राणीबाग मैदान वाचवण्यासाठी मनसेची निदर्शने

मुंबई : भायखळा येथील राणीबागेतील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारित कलादालनासाठी स्थानिक खेळाचे मैदान बळकावले जात असल्याचा आरोप करीत रविवारी मनसेने वस्तुसंग्रहालयासमोर निदर्शने केली. जमनालाल बजाज फाउंडेशन या संस्थेमार्फत आंतराराष्ट्रीय कलादालन उभारण्याच्या नावाखाली मैदान बळकावले जात असल्याचा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी केला आहे.
मैदानावर भायखळ्यातील घोडपदेव, सातरस्ता, लवलेन, सुंदरगल्ली, क्रॉसगल्ली, नारळवाडी अशा आसपासच्या परिसरातील असंख्य मुले खेळायला येतात. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो यांसारख्या मैदानी खेळांसोबतच जवळच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या खेळांच्या स्पर्धाही या ठिकाणी पार पडतात. भायखळा रेल्वे स्थानक आणि राणीबाग बस डेपोजवळ असल्याने मैदानांवर अनेक जणांचा डोळा आहे. तरीही स्थानिकांनी गेल्या ४० वर्षांपासून हे मैदान अतिक्रमणमुक्त ठेवले आहे. अशा परिस्थितीत वस्तुसंग्रहालय चालवणाऱ्या संस्थेने मैदान ताब्यात घेण्याचा कुटील डाव आखला आहे. मात्र तो डाव स्थानिक खेळाडूच उधळून लावतील, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
कोणताही प्रस्ताव मंजूर होण्याआधी तो पालिका सभागृह, सुधार समिती आणि स्थायी समितीमध्ये येथे चर्चेला येतो. मात्र या तिन्ही ठिकाणी चर्चा न होता, आणि स्थानिक नगरसेविकेलाही कोणतीही कल्पना न देता आयुक्तांनी परस्पर हा प्रस्ताव मंजूर कसा केला, असा सवाल स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
महापालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन तयार करायचे असेल, तर प्रशासनाने मैदानाशेजारील कचरा डेपोची जागा घ्यावी किंवा मफतलाल मिलची ७ एकर जागा नुकतीच पालिका प्रशासनाला मिळाली आहे. त्यातील काही जागा पालिकेने मैदानासाठी द्यावी, त्यानंतरच हे मैदान हस्तगत करावे; नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशाराही नाईक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MNS 'demonstrations to save the Ranibagh ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.