Join us  

आज मनसेचं महाअधिवेशन; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 7:22 AM

गोरेगाच येथील नेस्को सेंटर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होणार आहे

मुंबई : राज ठाकरे हिंदुत्वाची वाट स्वीकारणार का आणि मनसेच्या झेंड्यात शिवमुद्रेचा वापर केला जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गोरेगाच येथील नेस्को सेंटर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होणार आहे. स्वत: राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर, उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यानंतर नवीन झेंड्याचे अनावरण करण्यात येणार आहे. पक्षाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे. मनसे नेते अविनाश अभ्यंकर याबाबतची मांडणी करणार आहेत. राजकीय ठराव मांडल्यानंतर शेवटच्या सत्रात राज ठाकरे यांचे समारोपाचे भाषण असणार आहे.

या अधिवेशनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत. अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी बुधवारीच मुंबईत दाखल झाले आहेत. अधिवेशन स्थळी चहापानापासून भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा वापरू नये, अशी भूमिका काही मराठा संघटनांनी घेतली आहे. सध्याच्या वातावरणात मराठा संघटनांचा रोष ओढवून घेण्याची मनसे नेतृत्वाची इच्छा नाही. त्यामुळे इंजिन असलेल्या ध्वजाचाही पर्याय पुढे केला जात आहे. गुढी पाडवा, शिवजयंती आदी सभारंभात नेहमीप्रमाणे राजमुद्रेचा ध्वज वापरावा आणि राजकीय कार्यक्रमांसाठी इंजिन असलेला ध्वज वापरण्याचा तोडगा काढला जाऊ शकतो.

टॅग्स :मनसेराज ठाकरेहिंदू