Join us  

मनसेचा भाजपावर 'कार्टूनवार'; ती व्यंगचित्रं दाखवून मोदी-शहांना मऊसूत 'फटकार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 7:13 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई, ठाण्यासह उपनगरांतील वातावरण चांगलेच तापले आहे.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई, ठाण्यासह उपनगरांतील वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. त्यानंतर आता ट्विटरवरूनही मनसेनं मोदी-शहांना चिमटा काढला आहे.मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे कुंचल्याच्या माध्यमातून मोदी-शहांवर टीका करायचे, त्यांची व्यंगचित्र इतकी बोलकी असायची की भाजपाला दखल घ्यावीच लागायची. फडणवीस सरकारचा कोणताही निर्णय असो किंवा केंद्रातल्या मोदी सरकारनं घेतलेले अध्यादेश असो, राज ठाकरे व्यंगचित्रातून चांगलेच फटकारे मारत असतात. ईडी प्रकरणावरून मनसेनं आताही कुंचल्याच्या मऊसूत स्पर्शाने सुद्धा इतके घायाळ?, असा उपरोधिक टोला मोदी-शहांना लगावला आहे. ट्विटरवर मनसेच्या अधिकृत पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी मोदी-शहांवर टीका करणारी सर्व व्यंगचित्रे टाकली आहेत.  तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ठाणे बंद, कल्याण बंदचं आवाहन त्यांनी केलं होतं; पण २२ तारखेला - राज यांची चौकशी आहे त्या दिवशी अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असा सूचक इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला होता. परंतु ठाण्यातला बंद आता मनसेनं मागे घेतला आहे. 

राज ठाकरे जर खरे असतील, तर त्यांनी आपली सत्यता ईडीपुढे जाऊन सांगावी. निर्दोष असल्याचं सिद्ध करावं. उगाच बंद पुकारून नागरिकांना, सामान्य लोकांना त्रास का देता?, अशी चपराक मुख्यमंत्र्यांनी लगावली आहे. तसंच, कायदा हातात घेणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असंही त्यांनी ठणकावलं आहे.  

टॅग्स :राज ठाकरेमनसे