Join us
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या 'घड्याळा'ला मनसेचे 'काटे'?; राज ठाकरेंचा पवारांकडे 'या' तीन जागांचा प्रस्ताव

By संदीप प्रधान | Updated: January 29, 2019 18:45 IST

मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील एकेक जागा दिल्यास मनसेचं 'इंजिन' राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडीला जोडण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयार असल्याची कुणकुण 'लोकमत'ला लागलीय. 

>> संदीप प्रधान

गेले अनेक दिवस स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेनं आता भाजपाला युतीच्या प्रस्तावासाठी १५ दिवसांची मुदत दिली असतानाच, तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रस्ताव दिल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील एकेक जागा दिल्यास मनसेचं 'इंजिन' राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडीला जोडण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयार असल्याची कुणकुण 'लोकमत'ला लागलीय. 

ईशान्य मुंबई, ठाणे आणि दिंडोरी या लोकसभेच्या तीन जागा मनसेला मिळाव्यात, अशी राज ठाकरेंची मागणी आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच विचार करताहेत. अगदीच तीन नाही, पण दोन जागा राष्ट्रवादी मनसेसाठी सोडेल आणि नवा मित्र जोडेल, असं खास सूत्रांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याचं चित्र अलीकडच्या काळात अनेकदा दिसलं होतं. मग ती पवारांची महामुलाखत असेल, एकत्र केलेला विमान प्रवास असेल किंवा या दोघांमध्ये बंद दाराआड झालेलं गुफ्तगू. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड 'कृष्णकुंज'वर गेले होते, तेव्हा तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'कुछ तो गडबड है...' अशी चर्चाही रंगली होती. ती अगदीच उथळ नव्हती, असे संकेत आता मिळताहेत. 

एकीकडे, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेण्यासाठी काँग्रेसनं हालचाली सुरू केल्यात. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं फारसं जमत नाही. परंतु, मोदी सरकारविरोधात - भाजपाविरोधात महाआघाडीची भक्कम फळी उभी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस प्रकाश आंबेडकरांसाठी मोर्चेबांधणी करतोय. त्याच धर्तीवर, काँग्रेसचा मनसेशी सलोखा नाही. तरीही, महाआघाडीच्या हितासाठी पवारांचं हे 'राज'कारण त्यांना नाकारता येणार नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची अमित ठाकरे यांच्या लग्नातील उपस्थितीही ही बाब अधोरेखित करणारी आहे.

शरद पवार हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे खास मित्र. त्यामुळे राज ठाकरेंना ते काकांसारखेच आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार, सकाळी लवकर उठण्यासाठी राज ठाकरे यांनी मागे गजराचं घड्याळही आणलं होतं. आता ते राष्ट्रवादीचं घड्याळच मनगटावर बांधतात का आणि पवार काका त्यांचा तीन जागांचा हट्ट पुरवतात का, हे पाहावं लागेल.  

राज ठाकरेंना हव्या असलेल्या तीन जागांपैकी ईशान्य मुंबई आणि दिंडोरी मतदारसंघात सध्या अनुक्रमे किरीट सोमय्या आणि हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपाचे खासदार आहेत, तर ठाण्याचे खासदारकी शिवसेनेचे राजन विचारे यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील या तीन जागांवर आत्तापर्यंत पक्षाची कामगिरी कशी राहिली आहे आणि सध्याचं गणित काय आहे, हे पाहूनच शरद पवार अंतिम निर्णय घेतील, हे स्पष्टच आहे. सध्या तरी, ते दोन जागा मनसेसाठी सोडतील, असा अंदाज व्यक्त होतोय.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९राज ठाकरेशरद पवार