सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपने फोडली दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST2021-09-02T04:12:24+5:302021-09-02T04:12:24+5:30
मुंबई : राज्य सरकारचा बंदी आदेश झुगारत मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडली. सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांना चकवा ...

सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपने फोडली दहीहंडी
मुंबई : राज्य सरकारचा बंदी आदेश झुगारत मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडली. सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांना चकवा देत तर काही ठिकाणी पोलिसांदेखतच प्रतीकात्मक दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेधही केला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडीसह सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध लादले होते. मात्र, एरवी राजकीय सभा, मेळावे करणारे सरकार सणावारांच्या विरोधात का, असा प्रश्न उभा करत मनसेने दहीहंडी फोडणारच असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही सोमवारीच स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली होती. तर, काही ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकडही करण्यात आली. तरीही, मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री उशिरापासूनच दहीहंडी फोडायला सुरूवात केली. मानखुर्द, घाटकोपर भागात दहीहंडी फोडण्यात आली. तर, मंगळवारी सकाळपासून वरळी, वांद्रे, अंधेरी, मलबार हिल, मुलुंड भागात दहीहंडी फोडण्यात आली. दादर भागात सकाळीच दहीहंडी फोडण्यात आली.
काळा चौकी भागात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी येथील मैदानात दहीहंडी फोडली. या ठिकाणी दहीहंडी उत्सवासाठी मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राज्यभर राजकीय मेळावे तुडुंब गर्दीत सुरूच. सरकारची अळीमिळी गुपचिळी. मग आम्ही आमचे सण साजरे का करायचे नाहीत? असा सवाल त्यांनी केला होता. कोरोना निर्बंधांच्या नावाखाली प्रस्थापित राजकीय पक्षांच्या धनदांडग्या नेत्यांना एक न्याय आणि सर्वसामान्य जनतेसाठी दुसरा न्याय; ही सरकारी दडपशाहीची ‘डबल ढोलकी’ आहे, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला.