एमएमआरडीएच्या ‘आयकॉनिक’ इमारतीचे काम कासवगतीने
By Admin | Updated: August 22, 2015 01:18 IST2015-08-22T01:18:53+5:302015-08-22T01:18:53+5:30
बीकेसी येथे उभारण्यात येत असलेल्या एमएमआरडीएच्या ‘आयकॉनिक’ या कार्यालयीन इमारतीचे काम कासवगतीने सुरू आहे. साडेसात वर्षांपासून
एमएमआरडीएच्या ‘आयकॉनिक’ इमारतीचे काम कासवगतीने
मुंबई : बीकेसी येथे उभारण्यात येत असलेल्या एमएमआरडीएच्या ‘आयकॉनिक’ या कार्यालयीन इमारतीचे काम कासवगतीने सुरू आहे. साडेसात वर्षांपासून इमारतीचे काम रखडल्याने एमएमआरडीएच्या तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त बोजा वाढला आहे. त्यामुळे या इमारतीचा खर्च १0६ कोटींवर पोहोचला असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
बीकेसीमध्ये एमएमआरडीए ‘आयकॉनिक’ ही ११ मजल्यांची इमारत उभारत आहे. या इमारतीला २00७ मध्ये मंंजुरी मिळाली होती. इमारतीच्या बांधकामाची मूळ रक्कम ८७ कोटी होती. या इमारतीचे काम पाच वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे इमारतीच्या बांधकाम खर्चात तब्बल १९ कोटींनी वाढ झाली आहे. आयकॉनिक इमारतीच्या कामाची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे मागितली होती.
एमएमआरडीएने इमारतीच्या मूळ नकाशात आणि कामात बदल करणे तसेच वेगवेगळ्या यंत्रणेची एनओसी मिळण्यात विलंब झाल्याने इमारतीचे काम लांबणीवर गेल्याची माहिती गलगली यांना एमएमआरडीएने दिली आहे. एमएमआरडीएचे मुख्यालय प्रशस्त असतानाही प्रशासनाने १0६ कोटींचा चुराडा केल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे. (प्रतिनिधी)