मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएलाही हवी आरे कॉलनीच
By Admin | Updated: November 26, 2015 03:34 IST2015-11-26T03:34:21+5:302015-11-26T03:34:21+5:30
मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा देण्यास अनेक संघटनांच्या विरोधानंतर नेमलेल्या समितीने कांजूरमार्ग येथील जमिनीचा पर्याय सुचविला असला तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएलाही हवी आरे कॉलनीच
हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र
मुंबई : मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा देण्यास अनेक संघटनांच्या विरोधानंतर नेमलेल्या समितीने कांजूरमार्ग येथील जमिनीचा पर्याय सुचविला असला तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने मात्र पुन्हा आरे कॉलनीचाच आग्रह धरला आहे. तसे प्रतिज्ञापत्रच एमएमआरडीएने राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केले आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ च्या कारशेड उभारणीसाठी शेकडो झाडांची कत्तल करावी लागणार आहे. याला विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली. या समितीने कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेची शिफारस केली आहे. त्याला शासनानेही सहमती दर्शविली. परंतु या जमिनीच्या मालकीहक्काचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एमएमआरडीएला या जागेवर बांधकाम करणे शक्य झालेले नाही.
त्यातच आॅगस्ट महिन्यात ‘सेव्ह आरे’ या पर्यावरणवादी संघटनेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान आरेमध्ये कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी नाकारण्यात येईल, असे म्हटले होते. या निर्णयावर एमएमआरडीएने मध्यस्थी करत सोमवारी राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
कारशेडसाठी आरे कॉलनीतील ३0 हेक्टर जागेऐवजी २0.८२ हेक्टर जागा हवी असून, त्यावर कार डेपोसाठी सुविधा केंद्र बांधण्यास परवानगी देण्याची मागणी एमएमआरडीएने लवादाकडे केली आहे. शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कांजूरमार्ग येथे कारशेडसाठी जमीन न मिळाल्यास आरे कॉलनीत डबल डेकर कार डेपो बांधावा व प्रकल्प वेळेत मार्गी लागावा यासाठी कारडेपोचे सुविधा केंद्र बांधण्याची परवानगी द्यावी, असेही एमएमआरडीएने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.