मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गिका प्रकल्पात प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचे पाडकाम पुन्हा एकदा पुढे गेले आहे. या भागातील १९ इमारतींमधील रहिवाशांना त्याच भागात घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार आहे. त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) तयार केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रेकडे जाता यावे, यासाठी उन्नत मार्ग एमएमआरडीए उभारत आहे. या प्रकल्पात आधी १९ इमारती बाधित होत होत्या. मात्र, एमएमआरडीएने या पुलाच्या डिझाइनमध्ये बदल केला होता. त्यानंतर दोन इमारती बाधित होत आहेत. मात्र, या भागातील उर्वरित १७ इमारतींमधील रहिवाशांनी प्रकल्पामुळे त्यांच्या इमारतींनाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करून या इमारतींच्या पुनर्विकासाचाही प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. तसेच, या प्रश्नावर आंदोलन केले होते.
या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी उच्चस्तरीय बैठक झाली. येथील दोन इमारती पूर्णपणे बाधित होणार त्यातील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवावे त्यानंतरच पुलाचे पाडकाम सुरू करावे, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
सर्व १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीएने करावा. तसेच हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या इमारतींतील रहिवाशांना त्याच ठिकाणी पुनर्विकसित इमारतीत घरे दिली जावीत, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.
सरकारने लेखी आश्वासन द्यावे
अन्य १७ इमारतींचा पुनर्विकास कसा केला जाणार आहे याबाबतचे लेखी आश्वासन सरकारने द्यावे. तसेच याबाबतच्या निर्णयप्रक्रीयेत स्थानिकांना सामावून घेतले तरच पारदर्शकता राहील.
पुनर्वसनाचा निर्णय झाल्यानंतरच पुलाचे पाडकाम सुरू करावे, अशी मागणी रहिवासी श्रीराम पवार यांनी केली.