Join us  

Mono Rail कात टाकणार! मुंबईकरांसाठी १० नव्या मोनोगाड्या येणार; MMRDA ५९० कोटी खर्च करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 3:47 PM

Mono Rail: मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे.

मुंबई: कोरोना काळामुळे ठप्प असलेली रेल्वेची सेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे. तरी गाड्यांची कमतरता आणि कमी फेऱ्या यामुळे मोनो रेलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता लवकरच ही समस्या दूर होऊ शकणार आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने Mono Rail साठी कंबर कसली असून, आगामी वर्षभरात नवीन मोनोगाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. यासाठी भारतीय कंपनीला काम देण्यात आले असून, मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे.

मुंबईतील संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर दरम्यान २० किमी मार्गावर मोनोरेल धावत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असा हा प्रकल्प मानला जातो. मोनोरेल टिकवण्यासाठी भविष्यात या मार्गाला मेट्रो मार्ग जोडण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. आताच्या घडीला मोनोरेलसाठी प्रवाशांना साधारणपणे २५ ते ३० मिनिटे वाट पाहावी लागते. गाड्या उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवण्यास प्रचंड मर्यादा आहेत, असे सांगितले जात आहे. 

मेधा कंपनीला ५९० कोटींचे कंत्राट 

स्वदेशी बनावटीच्या १० गाड्या दाखल झाल्यानंतर एकूण १७ गाड्यांच्या माध्यमातून प्रति ४ ते ६ मिनिटाला एक फेरी उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. तसेच मेधा कंपनीला १० मोनोरेल गाड्या बांधण्यासाठी ५८९ कोटी ९५ लाखांचे कंत्राट देण्यात आले असून, मुंबई मोनोरेल प्रकल्पासाठी डिझाइन आणि तांत्रिक बाबींकरिता सल्लागार नियुक्तीसाठी खुल्या स्वरूपात निविदादेखील मागवल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पहिली देशी बनावटीची मोनोगाडी मुंबईत दाखल होईल

संबंधित कंपनीने मोनोरेल गाड्या बांधून त्याच ठिकाणी त्यांची चाचणी करावी, अशी महत्त्वाची अट या कंत्राटात आहे. यामुळे मुंबईत दाखल झाल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची गरज भासणार नाही. त्या थेट प्रवासी सेवेत दाखल करता येतील. गाडी बांधणी आणि चाचणी ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने साधारणपणे वर्षभरात पहिली देशी बनावटीची मोनोगाडी मुंबईत दाखल होईल. त्यानंतर टप्याटप्याने उर्वरित सर्व गाड्या ताफ्यात येतील, असे MMRDA चे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :मोनो रेल्वेमुंबईएमएमआरडीए