Join us  

एमएमआरडीएला मिळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 7:13 PM

विविध बँकांमध्ये १४,२५० कोटींच्या ठेवी

ठळक मुद्देवार्षिक व्याज ७८४ कोटी  

संदीप शिंदे

मुंबई : श्रीमंत प्राधिकरण अशी ख्याती असलेल्या एमएमआरडीएने तब्बल १४ हजार २५० कोटीं रुपयांच्या ठेवी विविध बँकांमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतविल्या आहेत. त्यातून विद्यमान आर्थिक वर्षांत एमएमआरडीएला ७८४ कोटी रुपयांचे घसघशीत व्याज मिळणार आहे. दैनंदिन आकडेवारी काढल्यास एमएमआरडीएच्या तिजोरीत व्याजापोटी दररोज २ कोटी १४ लाख रुपये जमा होत आहेत. कोरोना संक्रमणाच्या काळात एमएमआरडीएची आवक घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विकास कामांमध्ये खंड पडू नये यासाठी ही गंगाजळी उपयुक्त ठरणार आहे.

एमएमआरडीएकडे असलेल्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून यंदा १२ हजार ५५९ कोटी रुपये जमा होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश आहे. तर, प्राधिकरणाने हाती घेतलेली विकास कामे, प्रशासकीय खर्चासाठी एमएमआरडीएला १५ हजार ८१९ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. जमा आणि खर्चात ३ हजार २७० कोटींची तूट आहे. सध्या एमएमआरडीने विविध बँकांमध्ये १४ हजार ४२५ कोटींच्या मुदत ठेवी ठेवल्या आहेत. त्यावर जास्तीत जास्त ६.९० आणि कमीत कमी ४.७५ टक्के व्याज मिळत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी गुंतविलेल्या या ठेवींवरील व्याजाचा सरासरी दर ५.४० टक्के आहे. त्यातून वार्षिक ७८४ कोटी रुपये व्याज मिळणार असल्याची माहित एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली. कोरोनामुळे दाखल झालेल्या आर्थिक मंदीमुळे एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पातील जमा खर्चाचे अंदाजपत्रक विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गरज भासल्यास एमएमआरडीएच्या बँक खात्यांमध्ये असलेली गंगाजळी वापरता येईल अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

 ठेवी आणि व्याज घटले

२०१६ साली मुदत ठेवींवरील व्याजातून एमएमआरडीएच्या तिजोरीत १२१० कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर गेल्या तीन वर्षात ही व्याजाची रक्कम १००६, १०४९ आणि ६०० कोटी इतकी कमी झाली आहे. प्रकल्पांवर होणा-या कामांवरील खर्चासाठी या ठेवींमधूनही तजवीज करावी लागते. त्यामुळे रक्कम आणि त्यावरील व्याज कमी होत आहे. बँकांनी आता व्याजदर कमी केल्यामुळे त्यात आणखी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

 पालिकांकडून मिळणार ७६ कोटींचे व्याज

एमएमआरडीएने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई – विरार, कल्याण -डोंबिवली, कुळगाव – बदलापूर, मीरा भाईंदर आणि नायर रुग्णालयांना विविध कामांसाठी रकर्ज पुरवठा केला आहे. त्याच्या व्याजापोटी ७६ कोटी रुपये मिळतील अशी माहितीसुध्दा हाती आली आहे. 

टॅग्स :एमएमआरडीएमुंबईअर्थव्यवस्था