आमदार, मंत्र्यांनी साधेपणाने वागायचे आणि अधिकाऱ्यांचे काय?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 19, 2025 07:15 IST2025-01-19T07:15:43+5:302025-01-19T07:15:57+5:30

सरकार कामाला लागले आहे. त्यांना मिळणारे सल्ले मोलाचे आहेत. तरीही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याविषयी आपण मार्गदर्शन करावे, म्हणून हे पत्र लिहीत आहे.

MLAs and ministers should behave simply, but what about the officials? | आमदार, मंत्र्यांनी साधेपणाने वागायचे आणि अधिकाऱ्यांचे काय?

आमदार, मंत्र्यांनी साधेपणाने वागायचे आणि अधिकाऱ्यांचे काय?

- अतुल कुलकर्णी 
(संपादक, मुंबई)

माननीय देवाभाऊ,
आपण दाओसला निघालात. त्यासाठी शुभेच्छा. घाई गडबड असेल, प्रत्यक्ष भेटून बोलता येणार नाही. त्यामुळे हे पत्र लिहीत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले. त्यांनी मंत्र्यांना, आमदारांना कसे वागायचे? साधेपणाने कसे राहायचे? कुटुंबाची काळजी कशी घ्यायची? याविषयी मार्गदर्शन केले. त्याआधी शिर्डीत झालेल्या मेळाव्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्र्यांना काही मोलाचे सल्ले दिले होते. आता संघ परिवाराकडून भाजपच्या मंत्र्यांना काय अपेक्षा आहेत हे सांगितले जाणार आहे... सरकार कामाला लागले आहे. त्यांना मिळणारे सल्ले मोलाचे आहेत. तरीही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याविषयी आपण मार्गदर्शन करावे, म्हणून हे पत्र लिहीत आहे.

आपल्या पावलावर पाऊल ठेवून अजित दादाच्या पक्षाने शिर्डीतच त्यांच्या पक्षाचे संमेलन घेतले. ते ही साईबाबाच्या दर्शनाला जाऊन आले. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात देवपूजा करून आले. सगळ्यांची देवदर्शन यात्रा व्यवस्थित सुरू आहे. काहींनी होम हवन केले, तर काही मंत्र्यांनी मंत्रालयात विधिवत पूजा करून पदभार स्वीकारला आहे. काहींनी मध्यरात्री स्मशानभूमीत पूजा केल्याचीही अफवा आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा केला होता. तो अस्तित्वात आहे की नाही? हा प्रश्न सहज डोक्यात आला. या कायद्याची सध्याची स्थिती कोण सांगू शकेल..? असो. हा विषय महत्त्वाचा नाही. 

साधेपणाने राहायचे म्हणजे काय, असा प्रश्न काही आमदारांना पडला आहे. काही मंत्री कोट्यवधी रुपयांच्या गाडीतून फिरतात. काही वर्षांपूर्वी एका विद्यमान मंत्र्यांनी, आमदार असताना अजित दादांना सोन्याचे कव्हर असलेला मोबाइल दिला होता. दादांनी तो मोबाइल सिद्धिविनायकाला दिला होता. बाप्पांनी त्याचे पुढे काय केले माहिती नाही. असे मोबाइल वापरणे किंवा भेट देणे साधेपणात बसत नाही हे आता सांगावे लागेल. काहीजण मुंबईतल्या बड्या बड्या टेलरकडून गुलाबी आणि वेगवेगळ्या रंगांचे जॅकेट शिवून घेतात. हा साधेपणा नाही हेही सांगावे लागेल. 

बदल्यांच्या फायली घेऊन फिरू नका, हा लाख मोलाचा सल्ला मोदी साहेबांनी दिला. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कोणते आमदार, कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाइल घेऊन येतात याची यादी दर आठवड्याला आपण प्रकाशित केली तर... पारदर्शकतेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल का..? बदल्यांसाठी मंत्रालयातल्या सहा मजल्यांमध्ये जे काही चालते त्याच्यावर एक धमाल विनोदी मालिका होऊ शकते. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप ओळखी आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली तर बरे होईल... मधल्या काळात बदल्यांच्या अनेक सुरस कथा कानावर आल्या होत्या. खऱ्या खोट्या माहिती नाही...

एक आमदार सांगत होते, एका अधिकाऱ्याची बदली करा म्हणून एका आमदाराने सकाळी शिफारस घेतली. त्याच अधिकाऱ्याची बदली करू नका म्हणून दुसऱ्या आमदाराने दुपारी शिफारस घेतली. तर त्या अधिकाऱ्याची भलत्याच ठिकाणी बदली करा म्हणून तिसऱ्या आमदाराने संध्याकाळी शिफारस घेतली. ही तिन्ही पत्रे ज्या सचिवाकडे गेली त्यांनी त्या अधिकाऱ्याला सरळ सक्तीच्या रजेवर पाठवून दिले. तर दुसऱ्या दिवशी त्या सचिवाचीच बदली चौथ्या आमदाराच्या सांगण्यावरून झाल्याची चर्चा मंत्रालयात रंगली होती. 

मध्यंतरी एका मंत्री कार्यालयात बदल्यांचे रेट कार्ड तयार केल्याची माहिती होती. ज्यांनी मुंबईत बदली मागून घेतली त्यांना, नेत्यांच्या नातेवाइकांसाठी चेल्या चपाट्यांसाठी हॉटेल, गाड्या, घोडे यांची व्यवस्था करावी लागते. या गोष्टी साधेपणात येत नाहीत, हे त्यांना सांगायचे का..? काही आमदाराने मंत्री खूपच साधे आहेत. आम्ही साधेपणाने राहतो. मात्र आमचे अधिकारी कसे राहतात याचाही हिशेब कधीतरी मांडला पाहिजे, असे पत्रकारांना सांगत होते. काही अधिकारी हातात लाखो रुपयांचे घड्याळ, महागडे ब्रॅण्डेड कपडे, भारी भारी पेन, लाखो रुपयांचे शूज घालून येतात. त्यांना कोणीच कसे का बोलत नाही? असा प्रश्न ते तळमळीने उपस्थित करत होते. हे जर खरे असेल तर अशा अधिकाऱ्यांना आपण काही आचारसंहिता तयार करणार आहात का..?

मध्यंतरी एका अधिकाऱ्याने फाइलवर सही करताना उपसचिवाचाच पेन मागून घेतला. किरकोळ फाइलवर साध्या पेनने सही करतो. हजार पाचशे कोटीची फाइल असती तर माझ्या पेनने सही केली असती, असेही हसत हसत सांगितल्याची चर्चा होती. काही ऑफिसमध्ये फायलींना कायम ड्रायफ्रूट्सचा सुवास येत असतो. तर काही ऑफिसमधल्या फायलींवर चहाच्या कपाचे डाग असतात. यापैकी कोणती गोष्ट साधेपणात येते ते अधिकाऱ्यांनाही सांगायचे का..? आणखी बरेच मुद्दे आहेत; पण आपण घाईत असाल म्हणून थांबतो. दाओसहून येताना आमच्यासाठी काहीतरी घेऊन या...

- तुमचाच बाबुराव

Web Title: MLAs and ministers should behave simply, but what about the officials?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.