शपथविधीत वेगळेपणा जपणारा आमदार
By Admin | Updated: October 16, 2014 22:58 IST2014-10-16T22:58:29+5:302014-10-16T22:58:29+5:30
साबिर शेख हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचा त्यांनी अभ्यास केला होता.

शपथविधीत वेगळेपणा जपणारा आमदार
पंकज पाटील -अंबरनाथ
साबिर शेख हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचा त्यांनी अभ्यास केला होता. अमोघ वक्तृत्व लाभलेल्या साबीर भाईंनी आमदारकीची शपथ घेतांना वेगळेपणा जपल्याने ते आजही सर्वाच्या लक्षात राहिले आहे. हाच वेगळेपणा त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना जपली होती.
199क् झाली साबीरभाई हे अंबरनाथ मतदार संघातुन आमदार म्हणून निवडणून गेले होते. आमदार झाल्यावर त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतांना त्यांनी अंगावर भगवी शाल परिधान केली. तसेच पायातील चपला काढुन सर्वाना नमस्कार केला. व आपल्या पहाडी आवाजात शपथ घेतली की, ‘‘ज्यांच्या पार्थिवांच्या पायघडय़ांवरुन स्वातंत्र्य लक्ष्मी आमच्या अंगणात आली, त्या अगणित हुतात्म्यांना वंदन करुन शेख साबीर हाजी करीम महाराष्ट्र विधान सभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत आहे.’’ यांच्या या अनोख्या शपथ घेण्याच्या शैलीमुळे संपूर्ण विधानसभा भावुक झाली होती.
1995 मध्ये शेख पुन्हा आमदार झाल्यावर त्यांना शिवसेनेने कामगार मंत्रीपद बहाल केले. मंत्रीपदाची शपथ घेतांनाही त्यांनी आपला वेगळेपणा कायम ठेवला. या शपथविधीच्या वेळी ते म्हणाले की, ‘‘ भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजीन रायगडा’’
साबिरभाई हे अमोघ वक्तृत्वाने ओळखले जात होते. एवढेच नव्हे तर त्यांचा राज्यातील सर्व गड किल्यांचा अभ्यास होता. राज्यातील सर्वच गडांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. प्रत्येक गडाची माहिती त्यांना होती. त्यामुळेच त्यांना सह्याद्री भूषण म्हणूनही ओळखले जात होते. अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यात कामगार म्हणून त्यांनी काम केले होते. राष्ट्र सेवा दलाचे सैनिक म्हणून काम करित असतांनाच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर ते कडवे शिवसैनिक झाले. ते अखेर्पयत भगव्याचे पाईकच राहिले.
4आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर अंबरनाथमध्ये आयोजित केलेल्या शोक सभेतील भाषण आजही त्यांची आठवण करुन देणारे आहे. या भाषणातील सुरुवातच अशी होती की, शोकसभेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आसू आले होते. या भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की, ‘‘ रामाच्या त्या गरुडाला सांगेन की, फेकुन दे ते अमृत कलश आणि जाऊन सांग इंद्राच्या दरबारात, की मुङया सिंहासनाला धोका झालायं, कारण माझा आनंद स्वर्गात आलायं. ’’