आमदार ऋतुजा लटके यांनी केली गोखले पूलाची पाहणी
By मनोहर कुंभेजकर | Updated: February 5, 2024 18:06 IST2024-02-05T18:04:13+5:302024-02-05T18:06:01+5:30
विधानसभा अधिवेशनात आणि मुंबई मनपाकडे पत्रांद्वारे पाठपुरवठा करून लवकरात लवकर गोखले पूल नागरिकांसाठी वापरण्यास खुला करावा अशी मागणी आपण वारंवार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार ऋतुजा लटके यांनी केली गोखले पूलाची पाहणी
मुंबई - अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदार संघात अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या गोखले पुलाची अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राच्या शिवसेनेच्या आमदार ऋतुजा लटके यांनी आज पाहणी केली. 7 नोव्हेंबर 2022 पासून बंद असलेला गोखले पूल लवकरात लवकर पूर्ण करून सर्व नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशा सूचना त्यांनी उपस्थित असलेल्या मुंबई मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. सदर ब्रिज वापरास आल्यास अंधेरी पूर्व आणि पश्चिम मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विधानसभा अधिवेशनात आणि मुंबई मनपाकडे पत्रांद्वारे पाठपुरवठा करून लवकरात लवकर गोखले पूल नागरिकांसाठी वापरण्यास खुला करावा अशी मागणी आपण वारंवार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या पाहणीवेळी त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता संजय इंगळे, सब इंजिनियर शंभूराज धोत्रे, उपविभाग प्रमुख श्री. अनिल खांडेकर, शाखाप्रमुख विनोद चौधरी, महिला शाखा संघटिका आकांशा शिंदे त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.