Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबब! धान्यराशीसारखी आमदाराकडे नोटांची बंडले; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओने राजकीय वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 08:46 IST

कॉन्ट्रॅक्टरचे बिल द्यायला पैसे नाहीत, मग आमदारांकडे नोटांचे ढीग कसे?

मुंबई : शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममध्ये पैशांनी भरलेल्या बॅगेच्या व्हिडीओने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिल्यानंतर आता शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर नोटांच्या बंडलांची रास असलेला व्हिडीओ माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समोर आणला आहे. नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच दानवे यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर केल्याने ऐन गारठ्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दानवे यांनी तीन व्हिडीओ जारी केले आहेत. यामध्ये एका व्हिडीओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत, तर इतर व्हिडीओंपैकी एकात नोटांची बंडलं दिसत आहेत.

वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक

माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, माझ्याकडे या लोकांशी संबंधित असलेल्याच एका व्यक्तीने व्हिडीओ पाठवलेला आहे. मला माहिती नव्हते, त्यात कोण आमदार आहेत ते? तुम्ही नाव सांगितलेले आहे. त्यांच्यासारखा तो मला दिसतोय. समोरची व्यक्ती कोण आहे याचीदेखील तपासणी झाली पाहिजे. ⁠धान्याची रास असते तशी नोटांच्या ढिगाची रास आहे. एवढा पैसा नेमका येतो कुठून?

महाशय कोणाशी बोलत आहेत....

सामान्य माणसाने ५० हजार रुपयेदेखील बँकेत भरले तरी त्याला बँकेची नोटीस येते. इतक्या नोटांसंदर्भात हे महाशय कोणाशी बोलत आहेत? आणि ती व्यक्ती कोण हे देखील समोर येईल.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत. कॉन्ट्रॅक्टरचे बिल द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. इतक्या नोटांचे ढीग या सत्ताधारी लोकांकडे आहेत हे मी जनतेसमोर आणलेले आहे.

महेंद्र दळवी म्हणतात....

तो मी नव्हेच, ही तर एआयची करामत

अलिबाग : अंबादास दानवे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये मी नसून ते एआय पद्धतीने बनविले आहे. अंबादास दानवे यांनी समोर येऊन व्हिडीओंबाबत स्पष्टीकरण द्यावे. व्हिडीओ खरे असतील, तर अधिवेशनात राजीनामा देतो, असे आव्हान आमदार महेंद्र दळवी यांनी दिले आहे.

अंबादास दानवे यांनी टाकलेले व्हिडीओ कुठले आहेत, हे तेच सांगू शकतात. मी त्या व्हिडीओत नाही. हा व्हिडीओ सुनील तटकरे यांच्या माध्यमातून दानवे यांना पाठवला आहे, असा आरोपही दळवी यांनी केला.

महेंद्र दळवी म्हणत असतील हा मॉर्फ केलेला व्हिडीओ आहे. त्यांनी याबाबत पोलिसांकडे जावे आणि चौकशी करायला सांगावी. पोलिस माझ्याकडे आले तर मी सर्व गोष्टी त्यांना सांगेन. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ म्हटले की काही लोकांना राग येत होता; पण हे खोक्यांचेच राजकारण चालू आहे हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडीओ समोर आणला आहे.

आ. अंबादास दानवे,माजी विरोधी पक्षनेते

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Surrounded by Cash: Video Sparks Political Storm in Maharashtra

Web Summary : A video showing an MLA surrounded by stacks of currency notes has ignited a political controversy in Maharashtra. Ambadas Danve shared the video, questioning the source of the money and the MLA's dealings, amidst claims of AI manipulation by the concerned MLA.
टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनअंबादास दानवे