Join us  

वर्सोव्यातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना आमदार अँड अनिल परब यांनी दिल्या कानपिचक्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 7:52 PM

लोकसभेच्या यशानंतर उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे खासदार गजानन कीर्तिकरांना केवळ ९५०० मतांच्या आघाडीच्या जोरावर वर्सोवा विधानसभेसाठी शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - लोकसभेच्या यशानंतर उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे खासदार गजानन कीर्तिकरांना केवळ ९५०० मतांच्या आघाडीच्या जोरावर वर्सोवा विधानसभेसाठी शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे, नगरसेवक राजू पेडणेकर, महिला विभाग संघटक व नगरसेविका राजूल पटेल यांच्या जोडीने पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा)आंबेरकर, उपविभागप्रमुख हारून खान आदी पदाधिकारी आपल्याला उमेदवारी आपणाला मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत.

 २०१४ साली शिवसेना व भाजपा युती तुटली. भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून डॉ.भारती लव्हेकर या सुमारे 26000 मतांनी निवडून आल्या. त्यावेळी ऐनवेळी शिवसेनेची उमेदवारी जाहीर झालेल्या  नगरसेविका राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे फेटाळला गेला नसता तर निश्चितपणे २०१४ सालीच शिवसेनेचा येथून आमदार निवडून आला असता, भावना येथील शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही तीव्र आहे. त्यामुळे युती झाली तरी वर्सोवा मध्ये २०१७ च्या महापालिका निवडणूकीच्या यशाच्या आधारावर ही जागा शिवसेनाच लढवेल याची रणनिती शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यानी आखायला सुरुवात केली आहे. शिवसैनिक ही जागा आपल्याकडे खेचून घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

 खासदार गजानन कीर्तिकरांच्या निवडणूकीत सर्वात कमी मताची आघाडी मिळालेल्या वर्सोवा विधानसभेत उमेदवारीसाठी आपापसातील व्यक्तीगत स्वरूपाचे हेवेदावे पाहून शिवसेनेचे प्रवक्ते,आमदार व विभागप्रमुख अँड अनिल परब यांनी नुकत्याच अंधेरी (पूर्व) जे.बी.नगर येथील गोयंका हॉल येथे झालेल्या बैठकीत कोणाचेही नाव न घेता उघडपणे इच्छुकांना त्यांनी कानपिचक्या दिल्या.

उद्या दि,17 रोजी बिकेसी येथील विमा कंपन्यांच्या विरोधात सकाळी 10 वाजता शिवसेनेचा विराट मोर्चा निघणार आहे.त्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना विभाग क्रमांक 4 व 5 आणि चांदीवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रीत बैठक आमदार अनिल परब यांनी आयोजित केली होती.त्यावेळी त्यांनी या कानपिचक्या दिल्याचे समजते.

अँड.अनिल परब यांच्यावर वांद्रे पश्चिम,खेरवाडी, विलेपार्ले,वर्सोवा,अंधेरी पूर्व,अंधेरी पश्चिम,चांदिवली या  सात विधानसभा मतदार संघाची मोठी जबाबदारी आहे.त्यामुळे एकीकडे महायुतीचे उमेदवार या सात मतदार संघात निवडून आणतांना शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघातील व उद्धव ठाकरे तिकीट देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.

येत्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या राज्याच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर 164, वर्सोवा विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  एकालाच जर उमेदवारी दिली आणि बाकीच्या इच्छुकानी त्या उमेदवाराला व्यक्तीगत राग धरून पाडण्याचे काम केले तर मग आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच असू असे त्यांनी यावेळी ठासून सांगितले. 

आमदार परब यांनी ओघळपणे पण स्पष्ट पणे केलेल्या त्यांच्या भाषणात असे जर असेल तर पक्षप्रमुख एखाद्या साध्या शिवसैनिकाला उमेदवारी देतील असे सांगितले. हे सर्व कुणाचाही नामोल्लेख न करता आपल्या भाषणात सांगितले.त्यामुळे सामान्य शिवसैनिकांनी हा संदर्भ घेऊन वर्सोवा विधानसभे बाबतच या कानपिचक्या दिल्या असाव्यात अशी जोरदार चर्चा सध्या  शिवसैनिकांमध्ये आहे.

येथील आमदार डाँ भारती लव्हेकरांचा सुध्दा गेल्या ५ वर्षात मतदार संघातील दांडगा जनसंपर्क आहे हे नाकारता येत नाही.सध्या तरी भाजपमधून डाँ भारती लव्हेकर यांना पर्याय नाही.पण येथून तिकीट कोणाला द्यायचे ते सगळे ठरेल सेना भाजपानच्या वरीष्ठ पातळीवर हे मात्र निश्चित..

टॅग्स :अनिल परबशिवसेनावर्सोवा