एमकेसीएलचे कंत्राट रद्द होणार?
By Admin | Updated: November 10, 2014 01:17 IST2014-11-10T01:17:16+5:302014-11-10T01:17:16+5:30
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील आॅनलाइन प्रवेशासह अनेक कामांचे कंत्राट विद्यापीठाने एमकेसीएल या कंपनीला दिले आहे.

एमकेसीएलचे कंत्राट रद्द होणार?
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील आॅनलाइन प्रवेशासह अनेक कामांचे कंत्राट विद्यापीठाने एमकेसीएल या कंपनीला दिले आहे. मात्र, कंपनीकडून समाधानकारक काम होत नसल्याने विद्यापीठाने कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या असून, एमकेसीएलकडे असलेला विद्यार्थ्यांचा सर्व डाटा तातडीने विद्यापीठाला सादर करण्याचे पत्र विद्यापीठाने कंपनीला धाडले आहे.
मुंबई विद्याविद्यापीठाने २00६मध्ये एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) कंपनीबरोबर विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षा प्रक्रियेसाठी आॅनलाइन सुविधा पुरविण्याचा करार केला होता. करारानुसार एमकेसीएल विद्यापीठातील कर्मचारी आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार होते. तसेच विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती देणार होते. यासाठी विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५0 रुपये घेण्यात येतात. परंतु कंपनीच्या असमाधानकारक कामगिरीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी हॉल तिकीट न मिळणे, त्यामध्ये होणाऱ्या चुका अशा गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वेळोवेळी विद्यापीठाची नाचक्की झाली आहे. कंपनी आणि विद्यापीठाच्या करारामध्ये आजही विद्यापीठातील विद्यार्थी भरडले जात असूनही विद्यापीठाने कंपनीला कधीच जाब विचारला नव्हता. परंतु सिनेट सदस्यांनी कंपनीला हद्दपार करण्याची मागणी लावून धरल्याने अखेर विद्यापीठाने सिनेट सदस्यांना कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यानुसार विद्यापीठाने एमकेसीएल कंपनीकडे असलेला विद्यार्थ्यांचा प्रवेश, निकाल आदी डाटा तातडीने द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. या पत्राला कंपनीकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यापूर्वीच विद्यापीठाने प्रवेश आणि निकालाचे आॅनलाइन काम करण्यासाठी पर्यायी कंपनीची निवड करण्याची धावपळ सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.
विद्यापीठाने एमकेसीएल कंपनीकडे विद्यार्थ्यांचा डाटा मागितला आहे. (प्रतिनिधी)