मित्रा, लोकलच्या दारात उभा राहू नकोस!

By Admin | Updated: September 7, 2015 02:28 IST2015-09-07T02:28:43+5:302015-09-07T02:28:43+5:30

लोकलमध्ये उभे राहून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी टवाळकी करताना दिसतात. हीच टवाळकी करताना काही वेळेला लोकलमधून पडून अनेक विद्यार्थ्यांना प्राणास मुकावे लागते

Mitra, do not stand in the door of the local door! | मित्रा, लोकलच्या दारात उभा राहू नकोस!

मित्रा, लोकलच्या दारात उभा राहू नकोस!

मुंबई : लोकलमध्ये उभे राहून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी टवाळकी करताना दिसतात. हीच टवाळकी करताना काही वेळेला लोकलमधून पडून अनेक विद्यार्थ्यांना प्राणास मुकावे लागते किंवा गंभीर जखमी होतात. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे आरपीएफकडून एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थिनींकडून आपल्या मित्रांना लोकलच्या दारात उभे न राहण्याचा सल्ला देण्यात यावा, जेणेकरून अपघात टाळता येतील. यासाठी महाविद्यालयात जाऊन जनजागृतीही आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा बल) केली जाणार आहे.
२९ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत पश्चिम रेल्वे आरपीएफकडून विविध स्थानकांवर उपक्रम राबवण्यात आले. चर्चगेट, वसई रोड, मुंबई सेंट्रल, बांद्रे, भार्इंदर, दादर, बोरीवली, डहाणू रोड, वलसाड इत्यादी महत्त्वाच्या स्थानकांवर जनजागृतीच्या अनुषंगाने मोहीम राबवण्यात आल्या होत्या.
यात महिलांना सुरक्षेचे धडे, गुन्हेगारीशी निगडीत प्रवाशांमध्ये जनजागृतीसह अपघात होऊ नये, यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे महिला प्रवाशांची होणारी छेडछाड, शिवीगाळ, अश्लील हावभाव आदी गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे वरिष्ठ विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले. यासंदर्भात महिला महाविद्यालयांत प्रत्यक्षात भेट दिली जाणार असून, सध्या एका महाविद्यालयात भेट देऊन जनजागृती करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी विशेष पाऊल उचलण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक महाविद्यालयीन तरुण लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहतात. प्रवासात त्यांच्याकडून टवाळकी केली जाते. मात्र या नादात त्यांचा लोकलमधून तोल जातो किंवा खांब लागून ते पडतात.
अशा अपघातात त्या विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होते. हे पाहता महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपल्या मित्रांना ‘लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहू नका’ असा सल्ला द्यावा, जेणेकरून अपघात कमी होतील. आपल्या मैत्रिणींचा सल्ला प्रत्येक मित्र ऐकत असल्यानेच ही शक्कल लढवण्यात आल्याची माहिती झा यांनी दिली. ४0 महाविद्यालयांत सल्ला देणारा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mitra, do not stand in the door of the local door!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.