लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विरगो स्पेशालिटीज प्रा. लि. कंपनीचे जय जोशी (वय ४९) आणि व्होडर इंडिया एलएलपीचे केतन कदम (५०) यांना बेड्या ठोकल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या कागदपत्रांत कोड लँग्वेजमध्ये नोंदी आढळल्या आहेत. दुसरीकडे, कदम हा हाॅटेल व्यावसायिक असून त्याला नदी-नाल्यांतील गाळ काढण्याचा अनुभव नसतानाही कंत्राट देण्याच्या कामात सहभागी करून घेतले. तो ‘विरगो’, व्होडर कंपनीत पार्टनर किंवा संचालक नसताना त्यानेच भाडेकरारांवर सह्या केल्याचे उघड झाले.
आर्थिक गुन्हे शाखेने पालिकेच्या तिन्ही अभियंत्यांसह तिन्ही मध्यस्थ व अन्य संबंधितांच्या घर, कार्यालयांवर छापे टाकले. या कारवाईत मिठी नदीच्या निविदासंदर्भातील नस्ती, कागदपत्रे, दस्तऐवज, मोबाइल, आयपॅड, लॅपटाॅप, हार्डडिस्क, पेन ड्राइव्ह ताब्यात घेत जोशी आणि कदम यांना अटक केली.
कंत्राटदारांसोबत यंत्राचा भाडेकरार कंपनीने थेट करणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी मध्यस्थ व्यक्ती जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्या कंपन्यांशी भाडेकरार करण्यास कंत्राटदारांना भाग पाडले. दोन वर्षांसाठी या यंत्रांचे भाडे चार कोटी इतके ठरले, असा व्यवहार पालिका अधिकाऱ्यांनी कंपनी आणि मध्यस्थांच्या फायद्यासाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा ‘एसआयटी’ने केला आहे. या गुन्ह्यात पुरोहितला साक्षीदार बनविले आहे. जोशी आणि कदम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुरोहितकडे १० लाखांची मागणी कशासाठी केली? कदम याचे पालिका अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे कागदपत्रांवरून दिसते. त्याला कागदपत्रे कोणी पुरवली, याचा तपास सुरू आहे.
पालिका अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा तपशीलकदम याच्या घर, कार्यालयाच्या झडतीत महापालिका अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगच्या आदेशांच्या प्रती, निविदांसंदर्भातील नस्तींच्या फोटो काॅपीज, रोख रकमा स्वीकारल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. जोशी याने कदम याला गुन्ह्यात मदत केली आहे.
‘दोघांचेही तपासात असहकार्य’ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधील कोड लँग्वेजमधील नोंदींबाबत दोघेही सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोणाकडून किती पैसे आले, नदीच्या गाळाआड सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पैशांतील कमिशनच्या या नोंदी असल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला असून, त्याचा तपास सुरू आहे.