मालमत्तेचा बीओटीच्या नावाखाली गैरवापर
By Admin | Updated: February 12, 2015 22:42 IST2015-02-12T22:42:41+5:302015-02-12T22:42:41+5:30
महापालिकेच्या मालमत्ता बीओटी व भाडे तत्वावर देण्याचा सफाटा सत्ताधारी पक्षाने चालवला असून नेताजी उद्यानाचा विकास न करता भाडेतत्वावार देण्याचा घाट

मालमत्तेचा बीओटीच्या नावाखाली गैरवापर
सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिकेच्या मालमत्ता बीओटी व भाडे तत्वावर देण्याचा सफाटा सत्ताधारी पक्षाने चालवला असून नेताजी उद्यानाचा विकास न करता भाडेतत्वावार देण्याचा घाट घातला जात आहे. हे उद्यान भाडे तत्वावर देण्याला राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक विरोध करणार आहेत.
शहराचे सांस्कृतीक केंद्र टाऊन हॉल ३० वर्षासाठी नाममात्र भाडेतत्वावर दिल्यानंतर गोल मैदानातील अर्धाअधिक भाग व कॅम्प नं-४ मधील उद्यान ब्रह्मकुमारी संस्थेला १०० रूपये दरमहा भाडेतत्वावर दिले आहे. तसेच गोलमैदानातील उर्वरीत भाग मीड टाऊन संस्थेला गैरप्रकार उघड झाल्यानंतरही दिले आहे.
पालिका मुख्यालयामागील स्वीमिंग पूल व मोकळी जागा, नेताजी उद्यान मुलांच्या मनोरंजनाच्या नावाखाली भाडेतत्वावर देण्याचा घाट आहे. गुरुवारच्या महासभेत त्याला मंजूरी देण्याचे संकेत सत्ताधारी नगरसेवकांनी दिले आहेत.
पालिकेच्या ६० ते ७० समाजमंदिरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आजी-माजी नगरसेवकाचा ताबा असून त्यांचा गैरवापर होत आहे. पालिका वर्षानुवर्ष ही समाजमंदिरे ताब्यात घेऊ शकली नसून १८ आरक्षित भूखंडावरील कोटयवधीच्या मालमत्तांचा वापर बिल्डर करीत आहेत. एकंदरीत पालिका प्रशासन, सत्ताधारी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हे उभे ठाकले
आहे.