Join us  

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मिशन धारावी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 6:41 PM

कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढू नये. कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी. मृत्यू कमी व्हावेत यासाठी महापालिका युद्ध पातळीवर काम करत आहे.

 

मुंबई : वरळीनंतर धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. धारावीमधील कोरोनाबाधितांचा आकडा केव्हाच एक हजार पार गेला आहे. मात्र येथील कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढू नये. कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी. मृत्यू कमी व्हावेत यासाठी महापालिका युद्ध पातळीवर काम करत आहे. विशेषत: नव्याने आयुक्तपदी विराजमान झालेल्या इकबाल सिंह चहल यांनीदेखील धारावीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, येथील एकूण ४ हजार ४०७ खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर व वेग वाढवणे शक्य झाले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. 

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जी/उत्तर विभागात विशेषत: धारावी परिसरातील कोरोना रुग्णांच्या संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन) सुविधेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.  अँथनी डिसिल्वा स्कूल, भारत स्काऊटस अँड गाइडस सभागृह, माहिम निसर्गोद्यान, राजीव गांधी क्रीडा संकुल यासह विविध ठिकाणी केलेल्या व्यवस्थेची जयस्वाल यांनी पाहणी केली. अलगीकरणात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची विचारपूस करतानाच त्यांना मिळणारे जेवण, इतर सुविधा यांचे निरीक्षणदेखील केले. या विभागामध्ये कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १) अंतर्गत ३ हजार ७४० खाटांच्या क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये माहिम निसर्गोद्यान समोरील ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर २०० खाटांच्या जम्बो फॅसिलीटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलीटीमध्ये प्रत्येक खाटावर ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असेल.  कोरोना काळजी केंद्र २ अंतर्गत ६६७ खाटांची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सीसीसी १ आणि सीसीसी २ मिळून एकूण ४ हजार ४०७ खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर व वेग वाढवणे शक्य झाले आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर या विविध विभागांना भेटी देत असून त्या अनुषंगाने नागरिकांशी चर्चा करत आहेत.  सर्दी, ताप व खोकलाचे लक्षणे असणा-या रुग्णांची योग्य ती तपासणी करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सीमीटरने तपासण्याची सूचना करत आहेत. डॉक्टरांना पीपीई किटची आवश्यकता असेल तर त्यांच्या मागणीप्रमाणे ती तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचेही महापौरांनी सांगितले आहे. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई