‘मिसाईल मॅन’ कलामना सलाम!
By Admin | Updated: July 29, 2015 03:38 IST2015-07-29T03:38:30+5:302015-07-29T03:38:30+5:30
‘झोपल्यावर दिसतात ती स्वप्ने नसतात, जी तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्ने असतात’ या एका संदेशाने अवघ्या तरुणाईला जगण्याची नवी उमेद देणाऱ्या ‘मिसाईल मॅन’ला आदरांजली

‘मिसाईल मॅन’ कलामना सलाम!
मुंबई : ‘झोपल्यावर दिसतात ती स्वप्ने नसतात, जी तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्ने असतात’ या एका संदेशाने अवघ्या तरुणाईला जगण्याची नवी उमेद देणाऱ्या ‘मिसाईल मॅन’ला आदरांजली वाहण्यासाठी अवघी मुंबापुरी मंगळवारी दोन मिनिटे स्तब्ध झाली.
अग्निपंखांना स्वदेशी बळ देणारे डॉ. अब्दुल कलाम यांचे सोमवारी आकस्मिक निधन झाले आणि अवघा देश हळहळला. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कलामांच्या निधनावर प्रत्येक मुंबईकराने दु:ख व्यक्त केले. जी मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावते; अशा वेगवान मुंबईकरांच्या चर्चेत मंगळवारी केवळ कलाम एके कलामच होते. विद्यार्थीमित्रांपासून प्रत्येक वयोगटाला जगण्याची दिशा देणाऱ्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना मुंबईकरांनी उजाळा दिला. विशेषत: जे वाचले, जे ऐकले आणि दूरदर्शनच्या माध्यमातून कलामांबाबत जे पाहिले; अशा गोष्टी, घटना मुंबईकरांच्या डोळ्यांसमोर एकवटल्या.फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली जात असतानाच खासगी कार्यालयांमध्येही दोन मिनिटे मौन बाळगण्यात आले. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही कर्मचारी वर्गाने कलाम यांना आदरांजली वाहत त्यांचे विचार आयुष्यात अवलंबिण्याचा निर्धार केला. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावरही हळहळ!
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाल्याचे कळताच सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त करण्यात आली. सोमवारी सायंकाळपासून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियावर डॉ. कलाम यांना आदरांजली वाहणाऱ्या संदेश आणि छायाचित्रांचा ओघ सुरू झाला.
काही व्हॉट्सअॅप ग्रूपवर ‘एक दिवसाचा दुखवटा’ पाळत कोणतेही विनोद, हास्यास्पद छायाचित्रे पोस्ट न करता केवळ डॉ. कलाम यांना आदरांजली वाहणारे संदेश आणि छायाचित्रांचे शेअरिंग करण्यात आले. तसेच यात डॉ. कलाम यांचे संदेश आणि आठवणींचाच अधिक समावेश होता.
डॉ. कलाम राष्ट्रपती पदावर असतानाही कायम विद्यार्थ्यांच्या सहवासात राहायचे. ते केवळ आई आणि वडिलांच्या पुण्यतिथीला वर्षातून दोनदा सुटी घ्यायचे. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी कधी प्रवासाचा अवास्तव खर्च केला नाही, गरज असेल त्याच ठिकाणी त्यांनी प्रवास केला, असे डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनातील संदेशही सोशल मीडियावर शेअर झाले.
अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांना महापालिकेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. १३ फेब्रुवारी, २०१४ रोजी शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात औषधनिर्माण शास्त्र विभागाच्या समारंभानिमित्त अब्दुल कलाम हे आले होते. त्या वेळीही त्यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना भारावून टाकले होते. तामिळनाडूतल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आलेल्या कलाम यांचे जीवन, शिक्षण, कारकीर्द आणि विचार, योगदान हे सारे प्रेरणादायी असेच आहे. ते समस्त देशाचे प्रेरणास्थान ठरले.
- अजय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिका
अब्दुल कलाम यांची देशसेवा राष्ट्र विसरणार नाही. देशाला लाभलेले ते महान शास्त्रज्ञ होते. त्यांचा देशाला अभिमान होता आणि राहील. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेला वाहिले. भारताला जगातील महासत्ता बनविणे हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा दृढ निश्चिय करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
- खा.रामदास आठवले
अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशाला संशोधन क्षेत्रात सर्वोच्च स्थानी नेणारे महान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. कलाम यांंनी विज्ञानाच्या प्रसाराबरोबर देशाच्या उज्ज्वल प्रगतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. त्यांनी घालून दिलेले आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंबिले पाहिजेत.
- सचिन अहिर,
मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस