सराफांना गंडविणारी दुक्कल गजाआड
By Admin | Updated: November 14, 2015 02:45 IST2015-11-14T02:45:46+5:302015-11-14T02:45:46+5:30
ऐन दिवाळीत सोनेखरेदीच्या नावाखाली सराफांना गंडा घालणाऱ्या संगीता प्रकाश चव्हाण (४३) आणि अक्षय चव्हाण (२५) दुकलीला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या

सराफांना गंडविणारी दुक्कल गजाआड
मुंबई: ऐन दिवाळीत सोनेखरेदीच्या नावाखाली सराफांना गंडा घालणाऱ्या संगीता प्रकाश चव्हाण (४३) आणि अक्षय चव्हाण (२५) दुकलीला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
दादर येथील श्री नेमिनाथ ज्वेलर्स दुकानात गेल्यावर्षी २७ आॅगस्ट रोजी संगीता, अक्षय हे एका साथीदारासह सोन्याच्या अंगठी खरेदीसाठी आले होते. यावेळी हातसफाईने सोन्याच्या अंगठ्यांच्या जागी बनावट अंगठ्या ठेऊन तिघांनी पळ काढला. ही बाब सराफाच्या लक्षात येताच त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये लाखो रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या चोरी झाल्या होत्या. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.
मंगळवारी संगीता आणि अक्षय पुन्हा याच दुकानात अंगठी खरेदीसाठी आले. दुकानात चोरी करणारी हीच दुक्कल असल्याचे लक्षात येताच सराफाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. उपनिरीक्षक शहाजी जाधव, पोलीस नाईक पाटील आणि अडसूळ यांच्या तपास पथकाने या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
मूळचे अहमदाबाद येथील रहिवासी असलेली ही गँग दिवाळीत मुंबईत दाखल होत असे. यामध्ये संगीता हिचा पती सराफाला बोलण्यात गुंतवून ठेवून संगीता आणि तिचा दीर दागिने न्याहाळताना हातसफाईने सोन्याऐवजी बनावट दागिने ठेवून पळ काढत असत.