१३ कोटींच्या कामांना मिनिटभरात मंजुरी
By Admin | Updated: February 5, 2015 00:51 IST2015-02-05T00:51:11+5:302015-02-05T00:51:11+5:30
पालिकेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आल्याने जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीत केला.
१३ कोटींच्या कामांना मिनिटभरात मंजुरी
नवी मुंबई : पालिकेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आल्याने जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीत केला. या बैठकीत शहरातील १२ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांवर सदस्यांची बोलण्याची इच्छा असतानाही सभापतींनी एका मिनिटात सभा गुंडाळली. कार्यकाळाचा अंतिम टप्पा असल्याने प्रभागातील कामे मंजुर करण्याची सर्वपक्षीय नगरसेवकांची धावपळ यावेळी दिसून आली.
पालिका निवडणुकीची येत्या शनिवारी प्रभागांची सोडत जाहीर होणार असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निवडणूक लक्षात घेत पालिकेत गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत १८ प्रस्तावांना कुठल्याही चर्चेविना मंजुरी देण्यात आली.
विकास कामांच्या प्रस्तावांवर सदस्यांची चर्चेची इच्छा असतानाही सभापती सुरेश कुलकर्णी यांनी चर्चेला परवानगी नाकारली. राष्ट्रवादीचेच नगरसेवक राजू शिंदे हे सभागृहात चर्चेसाठी सभापतींकडे सातत्याने अनुमती मागत होते. मात्र सभापतींनी त्यांना सभागृहात बोलू न देता प्रस्ताव मंजुरीला टाकले. त्यानुसार अवघ्या एका मिनिटात सर्व प्रस्तावांना चर्चेविना मंजुरी देऊन सभा गुंडाळण्यात आली. विद्यमान नगरसेवकांचे कार्यकाळातील अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रभागात जास्तीत जास्त कामे मंजूर केल्याची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. (प्रतिनिधी)