कोकण रेल्वेने आंबा वाहतूकीला अल्पशा प्रतिसाद

By Admin | Updated: May 15, 2015 23:34 IST2015-05-15T22:20:30+5:302015-05-15T23:34:34+5:30

वाहनांची गर्दी : आंबा हंगामामुळे वाहतूक व्यवसाय वधारला

Minor Response to Mango Transit by Konkan Railway | कोकण रेल्वेने आंबा वाहतूकीला अल्पशा प्रतिसाद

कोकण रेल्वेने आंबा वाहतूकीला अल्पशा प्रतिसाद

एजाज पटेल - फुणगूस -हापूस आंबा हंगामामुळे वाहतूक व्यवसायाला चालना मिळाली आहे. वाशी बाजारपेठेत आंबा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रक - टेम्पोचा वापर केला जातो. घाटमाथ्यावरील अनेक ट्रक व्यावसायिक आपल्या गाड्या आंबा वाहतुकीसाठी कोकणात आणतात. कोकण रेल्वेतून जलद वाहतूक होत असून, आजही व्यावसायिकांनी आंबा वाहतुकीसाठी ट्रक, टेम्पो आदी खासगी वाहनांना दिलेली पसंती कायम आहे.हापूस आंबा हंगामाला सुरुवात झाल्याबरोबर या व्यवसायाशी निगडीत असलेल्या वाहतूक व्यवसायाला उर्जितावस्था येते. आंब्याचे प्रमाण वाढत जाते तसतसे आंबा वाहतूक सेवा करणाऱ्या कंपन्या गाड्यांच्या प्रमाणात वाढ करतात. पूर्वी काही मोजकीच आंबा वाहतूक सेवा केंद्र होती. आता गावागावातून या व्यवसायात वाढ होत आहे. आंबा हे नाशिवंत फळ असल्याने तोडणी झाल्यापासून फळ लवकरात लवकर बाजारात पोहोच करण्यासाठी बागायतदारांबरोबरच वाहतूक केंद्राची धावपळ सुरु असते. कोकणातून शेकडो गाड्या रोज वाशी फळबाजाराकडे धावत असतात. त्यासाठी अजूनही ट्रक वाहतुकीवरच अधिक भर आहे. मात्र, जिल्ह्यात गाड्या अपुऱ्या पडत असल्याने आंबा वाहतुकीसाठी कोल्हापूर, सांगलीबरोबरच अन्य ठिकाणच्या गाड्या येतात. काही ट्रक व्यावसायिक गेली कित्येक वर्षे एकाच वाहतूक केंद्रात आपल्या गाड्या लावतात. त्यामुळे ट्रक मालक व वाहतूक केंद्र यामधील ऋणानुबंध वाढत गेले आहेत. गाड्यांची चांगली स्थिती, इंजिन क्षमता, टायर स्थिती व विनाअपघात वाहने चालवण्याची परंपरा यामुळे वाहतूक सेवा केंद्रामधून अशा गाड्यांना प्राधान्य असते. दिवसा खेडोपाड्यात फिरुन आंबा पार्सल गोळा करुन झाल्यावर रात्रीपर्यंत फळबाजारात पार्सल घेऊन जाणाऱ्या गाड्या भरल्या जातात. संपूर्ण रात्र प्रवास करुन आंबा उन्हाच्याआधी फळबाजारात पोहोचतो. वाहतूक केंद्रात गाड्यांचे प्रमाण अधिक असते. क्रमांक येईल त्यानुसार गाड्या भरल्या जातात. त्यामुळे तक्रारीला वाव राहात नाही. आपला क्रमांक वरचा राहावा, यासाठी वाशी फळ बाजारात धावणाऱ्या गाड्या विनाथांबा धावत असतात. गाड्या खाली करुन झाल्यावर ते केंद्राकडे परतण्यामध्येही फार वेळ घालवत नाहीत. या चढाओढीमुळे आंबा वेळेवर बाजारात पोहोचतो. त्याचबरोबर अपघातविरहीत गाड्या हाकण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
आता ठिकठिकाणी वाहतूक केंद्र निघाल्यामुळे एकाच ठिकाणी एकवटलेली गर्दी कमी दिसली तरी वाहतूक व्यवसाय जोरात सुरु असल्याचे दिसते. आंबा लागवड दिवसेंदिवस वाढत असल्याने आंब्याच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. येथे तयार होणारा बराचसा आंबा वाशी, कोल्हापूर, पुणे, सांगली, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी पाठविला जातो.

Web Title: Minor Response to Mango Transit by Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.