विक्रोळीत बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: October 24, 2015 02:40 IST2015-10-24T02:40:23+5:302015-10-24T02:40:23+5:30
बापाने केलेल्या अत्याचारांमुळे १५ वर्षांची मुलगी गरोदर होण्याची नात्याला काळिमा फासणारी घटना विक्रोळी पार्कसाइट येथे घडली. या अत्याचारांबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास आत्महत्या क

विक्रोळीत बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुंबई : बापाने केलेल्या अत्याचारांमुळे १५ वर्षांची मुलगी गरोदर होण्याची नात्याला काळिमा फासणारी घटना विक्रोळी पार्कसाइट येथे घडली. या अत्याचारांबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास आत्महत्या करेन, अशी भीती हा बाप या मुलीला सुमारे वर्षभर देत राहिला. त्या भीतीने ही मुलगी सर्व सहन करत राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी पॉस्को, बलात्काराच्या गुन्ह्यात ३८ वर्षीय विकृत बापाला अटक करण्यात आली आहे.
विक्रोळी वर्षानगर परिसरात प्रिया (नाव बदललेले आहे) आई-वडील आणि अडीच वर्षांच्या भावासोबत राहते. परिसरातील शाळेत प्रिया नववीत शिकते. आई घरकामे करत असल्याने ती सायंकाळी घरी परतत असे. सकाळची शाळा असल्याने दुपारी घरी परतल्यानंतर प्रिया लहान भावासोबत एकटीच घरात असायची. दुपारी जेवणासाठी घरी येणाऱ्या बापाची वाईट नजर प्रियावर पडली. सुरुवातीला शस्त्राचा धाक दाखवून त्याने प्रियावर जबरदस्ती केली. याबाबत वाच्यता केल्यास मी आत्महत्या करेन आणि त्याला तू जबाबदार असशील, अशी धमकी त्याने मुलीला दिली. वडिलांनी आत्महत्या केल्यास डोक्यावरील छत्र हरपेल; शिवाय आपण याला जबाबदार राहू, या भीतीने प्रियाने वर्षभर हे अत्याचार सहन केले. गेल्या काही दिवसांपासून प्रियाचे पोट वाढत असल्याचे आईच्या लक्षात आले. त्यात तिच्यावर अॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया झालेली होती. त्यामुळे तिचे पोट वाढले असावे, या शक्यतेने आईने पुतण्याला सोबत घेऊन २१ आॅक्टोबरला सोनोग्राफी केली. त्यात ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. याबाबत मुलीकडे विचारणा केली असता, यासाठी वडील कारणीभूत असल्याचे सांगताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
गुरुवारी एका अज्ञात इसमाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. तक्रारीवरून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नराधम बापाला बलात्कार आणि पॉस्को कलमान्वये अटक केल्याची माहिती पार्कसाइट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली.