मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली काळा चौकी पोलिसांनी सहा जणांविरोधात रविवारी पॉक्सो, सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करत हे अत्याचार सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन आरोपींची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, २७ वर्षीय आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी १४ वर्षे नऊ महिन्यांची असून, तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, १७ वर्षीय आरोपीने पीडित मुलीसोबत जवळीक साधली. पुढे, गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी मुलीला अटक केलेल्या २७ वर्षीय आरोपीच्या घरी नेले. तेथे आरोपींनी तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर त्या व्हिडीओच्या आधारे आरोपींनी पीडित मुलीला आक्षेपार्ह व्हिडीओ पाठविण्यास भाग पडले. त्यानंतर अन्य चार अल्पवयीन आरोपींनीही पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी सर्व अल्पवयीन आरोपींची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. अल्पवयीन आरोपी १६ ते १७ वयोगटातील आहेत.
असा झाला प्रकार उघड
एका आरोपीच्या प्रेयसीला पीडित मुलीसोबत आरोपीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. तिने शनिवारी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईसमोरच याबाबत जाब विचारला. तेव्हा पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच याप्रकरणाचा वाचा फुटली. आईने मुलीसह पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणात पोलिसांनी मोबाइलही जप्त केले असून, न्यायवैधक तज्ज्ञांच्या मदतीने तपास करण्यात येत आहे.