मुंबई : अल्पवयीन मुलाला घरी बोलावून त्याच्यासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाला रविवारी पोलिसांनी अटक केली.मालवणीत अल्पवयीन राहतो. आरोपी हादेखील तेथे भाऊ, अन्य मित्रांसह भाडेतत्त्वावर एका खोलीत राहतो. तो रिक्षाचालक असून १५ जानेवारीला रात्री त्याचा भाऊ आणि अन्य सहकारी कामावर निघून गेल्याने तो घरात एकटा होता. त्या वेळी घराशेजारी त्याने सुमीत (नावात बदल) या ११ वर्षांच्या मुलाला एकटे पाहिले आणि घरी बोलावले. त्यानंतर सुमीतवर लैंगिक अत्याचार केले. वेदनेने विव्हळत असलेल्या सुमीतने घरी आल्यावर याबाबत घरच्यांना सांगितले. तेव्हा संतप्त कुटुंबीय आरोपीच्या घराकडे धावून गेले, मात्र तो पसार झाला होता. त्यांनी या प्रकरणी मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यात सुरुवात केली.मालाडमध्ये नातेवाइकाच्या घरात तो लपून बसल्याची खबर पोलिसांनी मिळाली. त्यानुसार तेथून त्याला अटक करण्यात आली आहे. सुमीतवर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, रिक्षाचालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 05:55 IST