पालिकेचे खातेप्रमुखही मंत्रालयाचे ‘बाबू’
By Admin | Updated: January 22, 2015 01:01 IST2015-01-22T01:01:51+5:302015-01-22T01:01:51+5:30
काँग्रेस सरकारच्या काळात अभियांत्रिकी पद मंत्रालयातून भरण्यास विरोध करणाऱ्या युतीच्या राज्यात खातेप्रमुखही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा घाट घातला जात आहे़

पालिकेचे खातेप्रमुखही मंत्रालयाचे ‘बाबू’
मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आल्यानंतरही पालिकेच्या कारभारातील सरकारी ढवळाढवळ काही थांबलेली नाही़ काँग्रेस सरकारच्या काळात अभियांत्रिकी पद मंत्रालयातून भरण्यास विरोध करणाऱ्या युतीच्या राज्यात खातेप्रमुखही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा घाट घातला जात आहे़
अभियांत्रिकी संचालक तसेच स्थायी समितीच्या अखत्यारीतील प्रमुख लेखापरीक्षकाचे पद राज्य सरकारमार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ हा वाद पुढे न्यायालयात पोहोचला़ मात्र त्यानंतरही राज्य सरकारची पालिकेच्या कारभारातील ढवळाढवळ थांबलेली नाही़ आता खात्याच्या प्रमुख पदावरही राज्य सरकारने पाठविलेले अधिकारी नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़
खातेप्रमुख होणाऱ्या अधिकाऱ्याकडे उत्तम प्रशासकीय कौशल्य असणे आवश्यक असते़ मात्र सध्याच्या विभागप्रमुखांच्या क्षमतेवर पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागानेच प्रश्नचिन्ह उभे केले आहे़ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या सहायक आयुक्तांची नेमणूक खात्याच्या प्रमुख पदावर करावी, असा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे़ (प्रतिनिधी)
च्पालिका कर्मचाऱ्यांना बढती मिळत-मिळत ते खातेप्रमुख पदापर्यंत पोहोचतात़ मात्र यात बदल करून यापुढे अनुज्ञापन अधीक्षक, प्रमुख निरीक्षक (दुकाने व आस्थापने खाते), प्रमुख कर्मचारी अधिकारी, प्रमुख कामगार अधिकारी, मुख्य पर्यवेक्षक (घनकचरा व्यवस्थापन वभाग), आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखपदी साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती होण्याची चिन्हे आहेत़