Join us

कबुतरखान्यावर मंत्री बैठक घेतात, पण मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर गप्प का? आता आश्वासने नकोत, सुरक्षित, वेगवान प्रवास हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:58 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे, एसटी फुल्ल आहेत. तर खासगी गाड्यांचे तिकीट सर्वसामान्य कोकणवासीयांना परवडत नाही.

मुंबई : गणेशोत्सव काही दिवसांवर आला तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सरकार शब्द काढत नाही. महामार्ग खराब असल्याने दहा वर्षांत ४ हजार ५०० प्रवासी मृत्युमुखी पडले असून, १० हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. सरकारला त्याचे सोयरसूतक नाही. दुसरीकडे कबुतरखान्यांवर मंत्री बैठक घेतात, पण या मार्गाच्या अवस्थेत काहीही फरक का पडत नाही? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी उपस्थित केला आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे, एसटी फुल्ल आहेत. तर खासगी गाड्यांचे तिकीट सर्वसामान्य कोकणवासीयांना परवडत नाही. तरीही ‘कोकण म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे कोकण’ ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मुंबईतला चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातोच. नारळी पौर्णिमेनंतर ही तयारी वेगाने सुरू होत असली, तरी कोकणात जाणाऱ्या महामार्गाने कोकणवासीयांची चिंता वाढवली आहे. महामार्ग खराब असल्याने अपघाताची भीती कोकणवासीयांना असून, कोंडी तर आमच्या पाचवीलाच पुजली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

मुंबई-गोवा महामार्गासाठी २०१६, २०१८, २०२०, २०२३, जून २०२५ या वेळोवेळी दिलेल्या ‘डेडलाईन’ केवळ घोषणा ठरल्या. प्रत्यक्षात महामार्ग अजूनही धुळीने भरलेला, खड्ड्यांनी वेढलेला आणि प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनांनी झाकोळलेला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पाहणी, दौरे काढून आश्वासने दिली जातात. पण, वर्षभर प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना अपघात, वाहतूक कोंडी या समस्यांबरोबरच वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी पडावे लागते. अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती

कोकणात जनआक्रोश शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी गणेशोत्सव महामार्गावरच साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या केवळ घोषणांवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. मंत्र्यांचे दौरेही जनतेच्या दबावामुळे औपचारिक फेरी वाटत आहे.मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती

सर्वसामान्य कोकणवासीयांचा सवाल महामार्गाचे अपूर्ण टप्पे पूर्ण करण्याचे आराखडे कोणते?काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि नेत्यांवर विलंबाबद्दल जबाबदारी निश्चित करण्यात आली का?

मागण्या काय?प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करावे आणि पाळावे.जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.वार्षिक नव्हे, मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा.अपघातात बळी गेलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर करावी.गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक मार्ग टप्पे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. 

टॅग्स :मुंबईगोवाकबुतर