Join us  

'आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही'; यशोमती ठाकूरांनी सुनावलं

By मुकेश चव्हाण | Published: October 05, 2020 11:57 AM

सुरेंद्र सिंह यांच्या वादग्रस्त विधानावरुन यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली/ मुंबई: हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच दरम्यान भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावरुन मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं. सुरेंद्र सिंह यांच्या या विधानावरुन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी चांगलचं सुनावलं आहे.

सुरेंद्र सिंह यांच्या वादग्रस्त विधानावरुन यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधला आहे. आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत. आम्हा महिलांनी कसं राहायचं हे अजिबात शिकवू नये, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितले. तसेच भाजपाने आधी आपल्या लोकांना संस्कार शिकवावे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी भाजपावर केली आहे.

सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.

मी आमदारासोबतच एक शिक्षकही आहे. या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात. शासन आणि तलवार त्यांना रोखू शकत नाही. आपल्या मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथे मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कोणीही समोर येणार नाही" असं वादग्रस्त विधान सुरेंद्र सिंह यांनी केले होते.

‘हाथरस’चा तपास सीबीआयकडे; योगी सरकारची घोषणा

उत्तर प्रदेश पोलिसांवर अथवा सीबीआयवर आमचा विश्वास नसून, आमच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिचा मृत्यू यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी केली. त्यानंतर काही मिनिटांतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा केली.मृत मुलीच्या कुटुंबीयांनी कधीही सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती. किंबहुना आम्हाला सीबीआय तपास नको, आमचा त्या यंत्रणेवर विश्वास नाही, असे कुटुंबातील प्रत्येक जाण सांगत होता. तरीही सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला आहे.

दरम्यान, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :हाथरस सामूहिक बलात्कारयशोमती ठाकूरउत्तर प्रदेशभाजपामहाराष्ट्र विकास आघाडी