Join us  

गोव्यातून दारु आणल्यास लागेल 'मोक्का', मंत्री शंभूराज देसाईनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 8:00 PM

मंत्री शंभुराजे देसाई यांनी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेशही दिले आहेत.

मुंबई - पर्यटनासाठी सर्वांचं आवडतं ठिकाण असलेलं गोवा हे दारुविक्रीसाठीही प्रसिद्ध आहे. गोव्यात दारुच्या किंमतीत महाराष्ट्रातील दारुकिंमतीपेक्षा चांगलीच कपात आहे. त्यामुळे, गोव्यात गेल्यानंतर महाराष्ट्रात दारू आणली जाते, अनेकजण आपल्या गाडीतून ही दारु महाराष्ट्रात आणतात. मात्र, आता गोवा व कर्नाटक राज्यातून (Goa & Karnataka) होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. यापुढे गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणल्यास दोषींवर मकोकाअंतर्गत (MCOCA) कारवाई केली जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई यांनी म्हटले.

मंत्री शंभुराजे देसाई यांनी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेशही दिले आहेत. गोव्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची तस्करी करण्याचं प्रमाण वाढलं असून कर्नाटक व गोवा राज्यातून होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी ही कडक तपासणी सुरु करा, असे आदेश शंभुराजे देसाईंनी दिले आहेत.  

महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक कोल्हापूर मार्गे होत असल्याने मी 7 जिल्ह्यांचा आढावा घेतला असून गोवा बनावटीची दारू विक्री करण्याचे रॅकेटमध्ये कोण-कोण आहे याचा अहवाल मी मागितला आहे. वारंवार दारू तस्करीचा गुन्हा केल्यास मोक्का लावण्याची तरतूद असून उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आणि संबंधित उपायुक्तांना वेळोवेळी कारवाई करण्याच्या सूचना केल्याचे देसाई यांनी सांगितले. गोव्याच्या दराने दारू राज्यात विकल्याने राज्याच्या उत्पन्नात घट होत असून राज्याची आर्थिक हानी होत आहे. त्यामुळेच, गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपात चेकपॉइंट्स उभारा. तसेच, तस्करी करणाऱ्यांविरोधात प्रस्ताव तयार करून पोलीस प्रशासनाला पाठवण्याची सूचनाही देसाई यांनी अधिकाऱ्यांना केली.

टॅग्स :शंभूराज देसाईदारूबंदीगोवा