Minister Pratap Sarnaik News: गेली तीन-चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ॲप आधारित संस्था प्रवाशांकडून आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून अशा आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थावर कडक कारवाई करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला (RTO) दिले आहेत. त्यानुसार गेली दोन दिवस अशा संस्थावर मोटार परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली.
सुमारे १४७ ॲप आधारित टॅक्सी सेवा वर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३६ टॅक्सी सेवानी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी केली होती. अतिवृष्टीमुळे मुंबई व उपनगरातील अनेक ठिकाणी बस व लोकल रेल्वे सेवा विस्कळित झाली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ॲप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या संस्था प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करित आहेत. जिथे २०० रुपये सामान्यतः भाडे होते तिथं या संस्थांनी ६००-८०० रुपये भाडे आकारले आहे. प्रतिकुल परिस्थितीमध्ये प्रवाशांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या लुटणाऱ्या या ॲप आधारित टॅक्सी चे परवाने गरज पडल्यास रद्द करण्यात यावेत असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत.
याबरोबरच मंत्री सरनाईक यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा करून पोलीसांच्या सायबर सेल कडून देखील अवैधरित्या भाडे आकारणी करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी सेवा वर कारवाई कराव्यात अशी सूचना केली. त्यानुसार मुंबई व उपनगरात अनेक ठिकाणी मोटार परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.