मुंबईभर होणार मिनी बीकेसी
By Admin | Updated: February 18, 2015 00:43 IST2015-02-18T00:43:19+5:302015-02-18T00:43:19+5:30
उद्योगधंद्यांचा मुलुंड व मालाड रेल्वेमार्गांवरही विस्तार होण्यासाठी २०१४-२०३४ विकास नियंत्रण आराखड्याच्या प्रारूपातून पाच ते आठ एफएसआयची शिफारस करण्यात आली आहे़

मुंबईभर होणार मिनी बीकेसी
शेफाली परब-पंडित - मुंबई
नरिमन पॉइंट, फोर्ट, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) अशा ठिकाणीच स्थिरावलेल्या उद्योगधंद्यांचा मुलुंड व मालाड रेल्वेमार्गांवरही विस्तार होण्यासाठी २०१४-२०३४ विकास नियंत्रण आराखड्याच्या प्रारूपातून पाच ते आठ एफएसआयची शिफारस करण्यात आली आहे़ यामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरातच व्यापार संकुल उभे राहिल्यास नोकरी-धंद्यासाठी दक्षिण मुंबईकडे येणारे लोंढे कमी होतील़ तसेच नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध होण्याबरोबरच खासगी वाहनांच्या वापरावरही आपोआप मर्यादा येईल, असा महत्त्वाकांक्षी प्लॅन या आराखड्यातून आखण्यात आला आहे़
पुढील २० वर्षांमध्ये मुंबईच्या विकासाची दिशा ठरविणाऱ्या विकास आराखड्याचे प्रारूप सोमवारी महापौर स्नेहल आंबेकर यांना प्रशासनाने सादर केले आहे़ यात दक्षिण मुंबईतच स्थिरावलेल्या उद्योग-धंद्यांचा मिनी बीकेसीच्या रूपाने शहरभर पोहोचविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे़ उदा़ चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा शहर भागातच असलेली आस्थापने, व्यापार गेल्या काही वर्षांमध्ये उपनगरांतही पोहोचले़ मात्र वांद्रे-कुर्ला संकुल, लोअर परळ, वरळी, अंधेरी असे काही ठरावीक विभाग वगळता अनेक ठिकाणी पोषक वातावरण असूनही उद्योगधंद्यांना बस्तान बसविता आलेले नाही़ त्यामुळे नोकरी-धंद्यांसाठी दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या लोंढ्यांचा ताण सार्वजनिक वाहतुकीवर पडू लागला आहे़
वाहतुकीवरील हा ताण आणि प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानक तसेच निवासी व्यवसायांच्या ठिकाणी एफएसआय वाढविण्यावर आराखड्यात भर देण्यात आला आहे़ आजच्या घडीला नरिमन पॉइंट, फोर्ट विभाग, बीकेसी, लोअर परळ आणि वरळी येथील कार्यालयांमध्ये येणारी मोठी लोकसंख्याही मुंबई, ठाणे व कल्याण येथून प्रवास करीत आहे़ या लोकसंख्येला त्यांच्या आसपासच्या स्थानकानजीक नोकरी उपलब्ध झाल्यास रेल्वे व रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा दावा या आराखड्यातून करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
च्दादर, अंधेरी या ठिकाणी आठ एफएसआय तसेच बोरीवली, मालाड, कस्तूर पार्क, डी़एऩरोड, कुर्ला, घाटकोपर, परळ, शिवाजी पार्क, काळबादेवी या ठिकाणी ६़५ एफएसआय देण्यात येणार आहे़ इतर रेल्वे स्थानके व मेट्रो स्थानकांशेजारी साडेसहापर्यंत एफएसआय मिळण्याची सोय आहे़ मध्य रेल्वेमार्गावर मुलुंड आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मालाड या दरम्यान जादा एफएसआय मिळाल्यास रेल्वे स्थानकांनजीक व्यापार थाटण्यास प्रोत्साहन मिळेल, जेणेकरून शहराच्या ठरावीक भागातच नोकरी-धंदा मर्यादित न राहता शहरभर लोकांना उद्योगधंदे उपलब्ध होतील़़
च्मुंबईला बिझनेस डेव्हलपमेंट फें्रडली बनविण्याची घोषणा महापालिकेने दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पातून केली होती़ भाजपा सरकारने सत्तेवर येताच मुंबईत उद्योगांना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली़ २०१४-२०३४ या विकास आराखड्यातून मुंबईचा विकास त्याच दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे़
पार्किंगवर मर्यादा
रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्त्यावरील वाहतूक हीदेखील मोठी समस्या बनली आहे़ खासगी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे़ यावर अनेक उपाय फेल गेल्यानंतर उपलब्ध पार्किंगवरच मर्यादा आणण्याचा विचार या आराखड्यातून केला जात आहे़ रेल्वे स्थानकानजीकच व्यापार संकुल विकसित झाल्यास लोकांना खासगी वाहनांनी येण्याची गरज पडणार नाही़ त्याचबरोबर अशा छोट्या व्यापारी संकुलातील पार्किंगची क्षमताही मर्यादित करण्यात येणार आहे़ त्यामुळे शहरातील अन्य पार्किंगच्या तुलनेत दादर, कुर्ला, अंधेरी स्थानकांबाहेर पार्किंगची व्यवस्था कमी असेल़
आरे कॉलनीचा विकास वादग्रस्त
मुंबईत शिल्लक राहिलेला एकमेव हिरवा पट्टा गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीच्या प्रस्तावित विकासाने हा आराखडा वादात सापडण्याची चिन्हे आहेत़ आराखड्यात आरे कॉलनीला विकास क्षेत्रात अंतर्भूत करण्यात आले आहे़ प्राणिसंग्रहालयाचा विस्तार आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड यामुळे येथील झाडांच्या कत्तलीचा विषय गाजत असताना आराखड्यातील बदलांमुळे आरे कॉलनीचे भवितव्य अंधारात आहे़
पार्किंगची वाढती समस्या
मुंबईत आजच्या घडीला २० लाख वाहने असून, दरवर्षी यामध्ये ७ ते ८ टक्के वाढ होत आहे़ खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे़ मात्र या तुलनेत मुंबईत फक्त ९२ वाहनतळ आहेत़ यामध्ये एका वेळेस १० हजार ३०४ वाहने उभी राहू शकतात़ वाढत्या खासगी वाहनांमुळे २०२१ मध्ये वाहनांचा आकडा ९० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे़