Join us  

Minakshi Thapa murder case : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणी दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 1:00 PM

नेपाळमधील अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवी दिल्ली - अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमित जयस्वाल, प्रीती सरिननं मीनाक्षीची निर्घृण हत्या केली होती. अपहरण, खंडणी व हत्या प्रकरणी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2012 मध्ये मीनाक्षीची हत्या करण्यात आली होती.  

काय आहे नेमके प्रकरण?

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याकडे काम करीत असलेले ज्युनिअर आर्टिस्ट अमित जयस्वाल व त्याची गर्लफ्रेंड प्रीती सरिन यांना बुधवारी सत्र न्यायालयाने मीनाक्षी थापाची हत्या, अपहरण व तिच्या कुटुंबीयांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोषी ठरवले.मीनाक्षी थापा ही नेपाळी अभिनेत्री होती. तिने हिंदी सिनेमांत छोटे-मोठे काम केले आहे. तिला आणखी काही सिनेमांत काम देतो, असे सांगून अमित व प्रीतीने तिची फसवणूक केली. तिला मुंबईहून गोरखपूरला आणल्यावर मीनाक्षीच्या कुटुंबाकडून १५ लाखांची खंडणी मागितली. मात्र, तिचे कुटुंबीय केवळ ६० हजार रुपये देऊ शकले.

मीनाक्षीने या दोघांना आपण फार श्रीमंत असून केवळ आवडीसाठी चित्रपट करीत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट त्यांनी रचला. परंतु, १५ लाखांऐवजी ६० हजार मिळत असल्याने त्यांनी तिची हत्या केली. ओळख पटू नये यासाठी धड, डोके वेगळे करून त्याची विल्हेवाट वेगवेगळ्या ठिकाणी लावली. पोलीस तपासात अमित व प्रीतीचा यात हात असल्याचे उघड झाले. दोघांनाही अटक झाली. २०१२ मध्ये अमित व प्रीतीने पैशांसाठी मीनाक्षीची हत्या केली. तिने मधुर भंडारकरच्या ‘हीरोइन’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या सेटवरच मीनाक्षीची अमित व प्रीतीशी ओळख झाली.

 

टॅग्स :खूनगुन्हा