Join us  

जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 8:39 AM

आमच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देऔवेसी यांनी भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्यावर केला जोरदार हल्ला जागा सांगा आणि मला गोळी घाला, मी तयार आहेऔवेसी यांनी दिलं ओपन चॅलेंज

मुंबई - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानावरुन विरोधी पक्षांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. तर ठाकूर यांच्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीम (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. देशातील कुठलीही जागा सांगा आणि त्याठिकाणी येऊन मला गोळी मारा असं आव्हान औवेसी यांनी अनुराग ठाकूर यांना दिलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. 

नागपाडा येथील झूला मैदान येथे व्हॉईस ऑफ इंडिया आयोजित कार्यक्रमात औवेसी म्हणाले, 'मी तुला अनुराग ठाकूरला आव्हान देईन, मला देशातील कोणतीही जागा सांगा, जिथे तुम्ही मला गोळी घालाल आणि मी येण्यास तयार आहे. तुमच्या वक्तव्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण होणार नाही कारण आमच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.

औवेसी पुढे म्हणाले की, देश वाचविण्याची आणि गांधींची तत्त्वे जिवंत ठेवण्याची लढा आहे.आज आपल्याला 'भाजपा छोडो' असा नारा द्यायचा आहे. सीएए हा भारताच्या संसदीय लोकशाहीसाठी एक घातक आणि काळा कायदा आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि गांधी-आंबेडकरांचा विचार ठेवण्यासाठी या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत हे जाणून घ्या. आम्ही जिन्नाचा संदेश नाकारला आहे. मोदी देशाचे सौंदर्य संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप त्यांनी सभेतून केला. 

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने ठाकूर यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या वादग्रस्त घोषणांबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रॅलीमध्ये भाषण करताना केंद्रीय अनुराग ठाकूर यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप विरोधकांनी लावला आहे. अनुराग ठाकूर मंचावरुन भाषण करताना देश के गद्दारो को अशी घोषणा देताना लोकांमधून गोली मारो .... को अशा प्रतिघोषणा देण्यात येत होत्या. 

Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त  

अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग गद्दार असा ट्रेंड सुरु आहे. याबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन अनुराग ठाकूर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकांना भडकवण्याचे काम करणाऱ्यांना जेलमध्ये असायला हवं त्याऐवजी अनुराग हे मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.   

टॅग्स :ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीननागरिकत्व सुधारणा विधेयकमुस्लीमभाजपा