एमआयएमने दिला वांद्रे मतदारसंघात उमेदवार
By Admin | Updated: March 24, 2015 02:31 IST2015-03-24T02:31:19+5:302015-03-24T02:31:19+5:30
वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी एमआयएमने राजा रेहबार सिराज खान यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होईल.
एमआयएमने दिला वांद्रे मतदारसंघात उमेदवार
मुंबई : वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी एमआयएमने राजा रेहबार सिराज खान यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होईल. शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे आणि एमआयएमचे सिराज खान हे उद्या (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आमदार अनिल परब व भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांच्या साथीने तृप्ती सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे या वेळी हजर नव्हते. परंतु त्यांनी टिष्ट्वट करून वांद्रे (पूर्व) मतदारसंघात शिवसेना-भाजपा-रिपाइंच्या वतीने उमेदवार अर्ज दाखल करीत असल्याचे जाहीर केले. राणे यांनी सोमवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची भेट घेतली व काँग्रेस कार्यकर्त्यांना एकदिलाने प्रचार करण्याचे आवाहन केले. स्वाभिमानी संघटनेचे नेते आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली व पाठिंबा देण्याची मागणी केली. (विशेष प्रतिनिधी)
आपणच विजयी होऊ
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार जनतेच्या मनातून उतरत चालले आहे. त्यामुळे आपण वांद्रे पोटनिवडणुकीत विजयी होऊ, असा विश्वास नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.