Millions of migrant workers return to the village | स्थलांतरित कामगारांचे तांडेच्या तांडे पुन्हा गावाकडे

स्थलांतरित कामगारांचे तांडेच्या तांडे पुन्हा गावाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई आणि राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा विपरीत परिणाम म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांत वास्तव्यास असलेले स्थलांतरित कामगार पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरवली येथे आपल्या मूळ गावी जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी स्थलांतरित कामगार दाखल होत असून, यात दिवसागणिक भरत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सातत्याने दिली जात आहे. मात्र, आर्थिक संकटात सापडलेले कामगार पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली असून, त्यांनी गावाकडची वाट पकडली आहे. दुसरीकडे या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत, याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे.

कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या सर्व कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योगांमध्ये कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील, याबाबत निश्चिंत रहावे. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खासगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भीती बाळगू नये. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्थाही होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेताना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

कोरोनासह लॉकडाऊनमुळे ३० ते ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झाली आहेत. ४० ते ५० टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. भविष्यात त्यांना नोकरी मिळेल, याची आशा धूसर झाली आहे. कारण, त्यांना रोजगार देणारे क्षेत्रच रसातळाला आले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार काम करतात. ही संख्या ७० टक्के असावी. स्थानिक कामगार फार कमी संख्येने या क्षेत्रात आहेत.

मुंबईत बाहेरील जिल्ह्यांतून, बाहेरील राज्यांतून स्थलांतरित झालेल्या मजुरांचा आकडा सुमारे ३० लाख असून, आज कोरोनाच्या संकटात हे स्थलांतरित मजूर वाऱ्यावर आहेत. या स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. किमान त्यांच्या खाण्या-पिण्याची आणि आरोग्याची तरी हेळसांड होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हणणे आता कामगार क्षेत्रातून मांडले जात आहे.

मुंबईत कामाठीपुरा, रे रोड, शिवडी, भायखळा, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, विद्याविहार, सायन, धारावी, माहीम, अंधेरी, साकिनाका, घाटकोपर, बोरीवली, जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणावर कामगार/मजूर राहतात. यातील बहुतांशी नाका कामगार, रोजंदारीवरचे कामगार आहेत. मात्र, आता लॉकडाऊन झाल्याने कामगारांचा रोजगार गेला. रोज हातात येणारा पैसे हातात येत नाही. त्यांना कोणी मालक नसल्याने महिन्याचा पगार कोण देणार, हा प्रश्न आहे.

------------------

गेल्या वर्षीची भीती कायम

लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेल्या मजूर, कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. कित्येक किलाेमीटर पायी चालत हे अंतर पार करावे लागले. गेल्या वर्षी बांद्रा टर्मिनसबाहेर दाेन वेळा लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार, या अफवेमुळे गर्दी उसळली हाेती. गर्दीला पांगवण्यासाठी पाेलिसांना लाठीचार्ज करावा लागला हाेता. त्यामध्ये अनेक कामगारांचा समावेश हाेता. ती भीती आजही कायम आहे. तशीच परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, याकरिता आधीच गाव गाठण्याचा प्रयत्न कामगार करीत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Millions of migrant workers return to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.