नियतकालिकांसाठी लाखोंचा खर्च
By Admin | Updated: June 19, 2016 03:06 IST2016-06-19T03:06:48+5:302016-06-19T03:06:48+5:30
ठेकेदारांवर पालिका करत असलेल्या खैरातीचे नवीन उदाहरण समोर आले आहे़ महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयासाठी खरेदी केलेल्या नियतकालिकांच्या किमती

नियतकालिकांसाठी लाखोंचा खर्च
मुंबई : ठेकेदारांवर पालिका करत असलेल्या खैरातीचे नवीन उदाहरण समोर आले आहे़ महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयासाठी खरेदी केलेल्या नियतकालिकांच्या किमती पाहून स्थायी समितीही चक्रावली आहे़ दोन कोटी रुपयांत खर्च करण्यात आलेल्या या नियतकालिकांची किंमत चक्क पाच ते आठ लाख रुपये आहे़ आयुक्त ५० ते ७५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च आपल्या अधिकारात करू शकतात़ केईएम रुग्णालयासाठी २५ एप्रिल रोजी प्रमुख रुग्णालयाच्या संचालकांनी खरेदी केलेली नियतकालिका तब्बल पाच लाख ५८ हजार रुपये एवढ्या किमतीची होती़ दुसरीची किंमत सहा लाख ६२ हजार रुपये होती, तर अन्य दोन नियतकालिकांची प्रत्येकी आठ लाख ५४ हजार रुपये किंमत होती़ अशा पाच ते आठ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या नियतकालिका कोणत्या? असा प्रश्न मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला़, तर ई-मॅगझिनच्या काळात करोडो रुपयांची पुस्तके कसली खरेदी करता? असा सवाल भाजपाचे दिलीप पटेल यांनी केला़ (प्रतिनिधी)
हे तर फक्त दोनच कोटी
ही नियतकालिके वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी खरेदी करण्यात आल्या आहेत़ यासाठी केवळ दोन कोटी रुपये खर्च झाले असल्याचे अजब स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त आय़ ए़ कुंदन यांनी दिले़