निर्यात अनुदान बंदमुळे दूध पावडरची थप्पी

By Admin | Updated: September 18, 2014 00:36 IST2014-09-18T00:35:52+5:302014-09-18T00:36:16+5:30

३०० चा दर १८० वर : दुहेरी संकटामुळे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघांची कोंडी

Milk powder paste due to export subsidy closure | निर्यात अनुदान बंदमुळे दूध पावडरची थप्पी

निर्यात अनुदान बंदमुळे दूध पावडरची थप्पी

राजाराम लोंढे -कोल्हापूर -दूध पावडर उत्पादन हे राज्यातील दूध संघांच्या पुन्हा एकदा मुळावर आले आहे. केंद्र सरकारने दूध पावडरवरील निर्यात अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दूध संघांना फटका बसला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात ३०० रुपये किलो असणारा दर १८० रुपयांपर्यंत खाली आल्याने संघ आर्थिक अडचणीत आले आहेत. या निर्णयामुळे पावडर निर्मिती बंद करावी तर शेतकऱ्यांचे ‘प्लस सिझन’मधील दूध काय करायचे, असे दुहेरी संकट दूध संघांसमोर उभे राहिले आहे.
राज्यात सर्वसाधारणपणे ६० हजार टन पावडर निर्मिती होते. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी दूध पावडरची निर्यात बंदी केली होती. केवळ निर्यात बंदीवर न थांबता एक लाख टन पावडर आयात केल्याने पावडर उत्पादन करणारे संघ अडचणीत आले होते. केंद्र सरकार ५ टक्के निर्यात अनुदान दूध संघांना देते, पण महिन्यापासून पावडर निर्यात अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. राज्यात नऊ दूध संघांकडे दुधापासून पावडर तयार करण्याचे प्रकल्प आहेत. त्यातील बहुतांशी संघ हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. गायीचे दूध मोठ्या प्रमाणात असल्याने व गायीच्या दुधाला बाजारपेठ नसल्याने या दुधाची पावडर तयार केली जाते. शासनाच्या धोरणानुसार गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.साठी १७ रुपये ५० पैसे उत्पादकाला द्यावे लागतात. ते दूध संघापर्यंत आणण्यास किमान तीन रुपये खर्च प्रतिलिटर येतो, पण याच दुधापासून तयार केलेली पावडर व बटरला तेवढा दरही मिळत नसल्याची तक्रार संघांची आहे.

‘गोकुळ’ व ‘अमूल’ हे दूध संघ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडरच्या दरावर दुधाचे दर कमी-जास्त करीत नाहीत. इतर संघांनी केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून न राहता, देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करायला हवे.
- डी. व्ही. घाणेकर (कार्यकारी संचालक, ‘गोकुळ’ )


केंद्राच्या अनुदानामुळे किलोमागे संघांना १० ते १५ रुपये मदत व्हायची, पण ती बंद केल्याने काहींना दुधाच्या दरात कपात करावी लागली आहे. केंद्र सरकारने पावडर निर्यात अनुदान १० टक्के करावे.
- विनायक पाटील (अध्यक्ष, ‘महानंदा’ दूध)

गाय दुधाचे पावडर निर्मिती करणारे संघ :
वारणा, गोकुळ, गोवर्धन, डायनॅमिक-बारामती, सोनाई-इंदापूर, साळोखे-इचलकरंजी, चितळे, प्रभात-नगर, थोरात.
गायीबरोबर म्हैस दुधापासून पावडर निर्मिती :वारणा, गोकुळ, चितळे.

देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या किलोला १८० ते २०२ रुपयांपर्यंत दर आहे; पण देशातंर्गत बाजारपेठेत २३५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

Web Title: Milk powder paste due to export subsidy closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.