मायलेकीला दारूड्याने जाळले
By Admin | Updated: February 20, 2015 02:19 IST2015-02-20T02:19:42+5:302015-02-20T02:19:42+5:30
एका दारूड्याने रागाच्या भरात पत्नी आणि दीड वर्षांच्या लेकीला पेटवून दिल्याची घटना बुधवारी वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरात घडली.

मायलेकीला दारूड्याने जाळले
मुंबई : एका दारूड्याने रागाच्या भरात पत्नी आणि दीड वर्षांच्या लेकीला पेटवून दिल्याची घटना बुधवारी वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरात घडली. यामध्ये ८० टक्के भाजलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मातेची मृत्यूशी झुंज सुरू आहे. शैलेश रामनाथ गौतम (२४) या आरोपीला खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली.
पेशाने टेलर असलेला शैलेश आणि सुशीला आपल्या दिड वर्षांच्या मुलीसोबत दहा दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेशातून मुंबईत आले होते. मात्र या दहा दिवसांमध्ये शैलेश दारूडा असल्याचे सुशीलाच्या लक्षात आले. दररोज रात्री नशेत घरी आलेल्या शैलेशसोबत तिचे वाद होत. बुधवारीही दहाच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात शैलेशने सुशीला अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले. याचवेळी दिड वर्षांची मुलगी सुशीलाच्या अंगावरच होती. त्यामुळे दोघीही आगीत पूर्णपणे होरपळल्या. शैलेशने दारूच्या नशेत हा गुन्हा केल्याचे खेरवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गंभीररित्या जखमी झालेल्या मायलेकींना वांद्रयाच्या भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले. गुरूवारी दुपारी उपचारांदरम्यान मुलीचा मृत्यू झाला.