Join us

अवयवदानात मिळाला परप्रांताचा ‘हात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 09:55 IST

सध्या सात रुग्ण हात मिळविण्यासाठी  प्रतीक्षा यादीवर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत दिवसागणिक प्रगती होत असताना पाच वर्षांपासून राज्यात हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात येत आहेत. आजपर्यंत राज्यात १५ दात्यांनी हाताचे दान केले असून, गरजू रुग्णांना २६ हात मिळाले आहेत. विशेष म्हणजे हातांचे दान करणारे १५ पैकी १३ दाते हे परराज्यातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही हाताचे दान करण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या सात रुग्ण हात मिळविण्यासाठी  प्रतीक्षा यादीवर आहेत.

राज्यात २७ ऑगस्ट २०२० रोजी हाताच्या प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया मोनिका मोरे या तरुणीवर झाली होती. त्यानंतर हात प्रत्यारोपणाच्या १५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी २ रुग्णांवर महापालिकेच्या केइएम रुग्णालयात, तर १३ शस्त्रक्रिया परळ येथील ग्लेनेगल रुग्णालयात करण्यात आल्या.  

बहुसंख्य दाते परप्रांतांतील

‘केइएम’मध्ये दोन रुग्णांवर प्रत्येकी एक हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी दोन दात्यांनी हात दिले होते, तर ग्लेनगल रुग्णालयात १३ रुग्णांवर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामध्ये ११ रुग्णांवर प्रत्येकी दोन हाताच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर दोन रुग्णांवर प्रत्येकी  एक हात प्रत्योपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये हात देणारे दोन दाते महाराष्ट्रातील आहेत, तर १३ दाते राज्याबाहेरचे म्हणजे इंदूर, सुरत, अहमदाबाद, चेन्नई येथील आहेत. 

नातेवाइकांचा अधिकार 

स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या (सोटो) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणते अवयव दान करायचे हा अवयव दात्याच्या नातेवाइकांचा अधिकार आहे. त्यांचे समुपदेशन केले जाते. मात्र, कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही.

आमच्या रुग्णालयात हात प्रत्यारोपणाच्या १३ शस्त्रक्रिया झालेले सर्व रुग्ण चांगले आहेत. आपल्या राज्यात इतर अवयवदानासंदर्भात जनजागृती सुरू आहे. त्यातुलनेत अजून हात दानाची जनजागृती झालेली नाही. त्यामुळे हाताचे दान फार कमी प्रमाणात होते. - डॉ. नीलेश सातभाई, प्लास्टिक सर्जन, ग्लेनगल रुग्णालय 

टॅग्स :अवयव दान