Join us

बार-रेस्टॉरंटवर मध्यरात्री धाड, हॉटेल सील अन् २४५ जणांकडून दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 09:05 IST

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील स्थिती अद्याप बिकट नाही. मात्र, अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लाॅकडाऊनपासून दूर राहू शकतो, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देकोरोना विषयक कारवाईत मास्क न परिधान करणे आणि सामाजिक अंतर न राखणे या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफ .आय. आर. नोंदविण्यात आला आहे

मुंबई - राजधानी मुंबईच्या ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' वर बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने या हॉटेलवर धाड टाकून तब्बल २४५ विना मास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई केली. तसेच, अनेक जणांवर कोरोना महामारीअंतर्गत गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत.  

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील स्थिती अद्याप बिकट नाही. मात्र, अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लाॅकडाऊनपासून दूर राहू शकतो, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, व्यापारी, दुकानदार आणि हॉटेल व बार व्यवसायिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अनेक हॉटेल्स आणि बार रेस्टॉरंटमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली.

कोरोना विषयक कारवाईत मास्क न परिधान करणे आणि सामाजिक अंतर न राखणे या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफ .आय. आर. नोंदविण्यात आला आहे. तसेच, हे रेस्टॉरन्ट आणि बार' महापालिकेने ठराविक काळासाठी सीलही केले. रेस्टॉरंटमधील २४५ लोकांकडून १९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही लोकांमध्ये गांभीर्य दिसत नसून विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यानगर पालिका