म्हाडाची एसआरए योजना गुंडाळणार
By Admin | Updated: February 4, 2015 02:44 IST2015-02-04T02:44:15+5:302015-02-04T02:44:15+5:30
म्हाडाच्या शहर आणि उपनगरांमधील जागांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन एसआरए योजनेमार्फत करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता.

म्हाडाची एसआरए योजना गुंडाळणार
मुंबई : म्हाडाच्या शहर आणि उपनगरांमधील जागांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन एसआरए योजनेमार्फत करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. या योजनेचे ६२ पैकी सुमारे १२ प्रस्ताव मंजूरही झाले होते. परंतु ही योजना म्हाडाने न करता एसआरए प्राधिकरणाने राबवावी, असे संकेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिल्याने ही योजना गुंडाळण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे. या निर्णयामुळे पुनर्विकासातून म्हाडाला मिळणाऱ्या सुमारे १५ हजार घरांवर पाणी फे रले आहे.
म्हाडाच्या ३५० हून अधिक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. या भूखंडांवरील १९९५ पूर्वीच्या झोपड्या राज्य शासनाच्या नियमानुसार पात्र ठरल्या आहेत. या झोपड्यांचा पुनर्विकास खासगी बिल्डरांनी केल्यास म्हाडाला कोणताही लाभ मिळणार नसल्याने म्हाडाने येथील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून सर्वसामान्यांसाठी सुमारे १५ हजार घरे उपलब्ध होणार होती. यासाठी म्हाडाने एसआरए प्राधिकरणाला पत्र लिहून म्हाडाच्या जागेवरील झोपड्यांच्या पुनर्विकासास खाजगी बिल्डरांना परवानगी देऊ नये, अशी विनंती केली होती.
झोपड्यांच्या सर्वेक्षणासाठी म्हाडाने संस्थांची मदत घेऊन पात्र झोपडीधारकांची यादी तयार केली. यानंतर ही योजना राबविण्यासाठी म्हाडाने विकासकांकडून प्रस्ताव मागवले. त्यास २५५ विकासकांकडून प्रतिसाद मिळाला. त्यानुसार ६२ ठिकाणच्या योजना राबविण्यासाठी म्हाडाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार योजनेच्या कामाची निविदा प्रक्रियाही तयार केली. मात्र ही योजना म्हाडाने न करता एसआरए प्राधिकरणाने राबवावी, असे संकेत गृहनिर्माण मंत्र्यांनी दिल्याने म्हाडा अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना १५
हजार घरांना मुकावे लागणार
आहे. (प्रतिनिधी)