Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या वसुलीकाराचा संक्रमण शिबिरांच्या भाड्यावर डल्ला, तब्बल ५ कोटी ७० लाखांचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 06:23 IST

दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  

मुंबई : एकीकडे संक्रमण शिबिराचे १२५ कोटींचे भाडे थकवून म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दहा विकासकांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू असताना, दुसरीकडे म्हाडाच्या मिळकत विभागात भाडेवसुलीच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले.   भाडे वसुलीकार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने पुनर्रचित इमारती व संक्रमण शिबिरातील रहिवाशांकडून वसूल केलेली रक्कम म्हाडाच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवल्याचा आरोप असून ५ कोटी ७० लाख ६७ हजार ९२८ रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. 

मिळकत व्यवस्थापक परिमंडळ ४ कार्यालयात कार्यरत असलेले मिळकत व्यवस्थापक प्रमोद कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.  २०२३ दरम्यान पुनर्रचित इमारतीतील काही रहिवाशांनी भाडे पावत्यांबाबत तक्रारी केल्या. भाडे वसुली चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे सांगत त्यांनी पावत्यांच्या छायांकित प्रती कार्यालयात सादर केल्या. तक्रारींच्या अनुषंगाने तत्कालीन भाडे वसुलीकार जगदीश धार्मिक (५७) यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला.  तपासणीत रहिवाशांना देण्यात आलेल्या पावत्यांवरील रक्कम आणि म्हाडाच्या खात्यात जमा झालेल्या रकमेत तफावत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणाची  चौकशी करण्यासाठी  समितीची नियुक्ती करण्यात आली.   

घोटाळा असा उघड झाला...

वसुलीकार जगदीश धार्मिक यांनी त्यांच्या कार्यकाळात रहिवाशांना २२,२०९ पावत्या दिल्या होत्या. मात्र त्यापैकी फक्त १३,५५१ पावत्यांचे रेमिटन्स कार्यालयात आढळले. तर ८६५८ पावत्यांचे रेमिटन्स नोंदवहीत नाहीत, असे स्पष्ट झाले. तपासणीदरम्यान रहिवाशांकडून मिळालेल्या ६,५९१ पावत्यांच्या छायांकित प्रतींची पडताळणी करण्यात आली असता त्यापैकी ३,३६८ पावत्यांमध्ये जमा झालेल्या रकमेपेक्षा ५३ लाख २६ हजार ६४० रुपयांची तफावत असल्याचे आढळले. 

२०२३ पासून सेवेतून निलंबित  

सरासरी प्रमाण काढण्यात आले असता, उपलब्ध १३५५१ पावत्यांमध्ये २ कोटी १४ लाख ३१ हजार ५०२ रुपये अपहार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. कार्यालयात रेमिटन्स नसलेल्या ८६५८  पावत्यांवरून सुमारे ३ कोटी ५६ लाख ३६ हजार ४२६ रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. धार्मिक यांना १० जुलै २०२३ पासून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Official Embezzles Funds Meant for Transit Camp Rent: 5.7 Crore Scam

Web Summary : A MHADA employee allegedly embezzled ₹5.7 crore in rent meant for transit camps and redeveloped buildings. Discrepancies in receipts triggered the investigation, leading to suspension.
टॅग्स :धोकेबाजीम्हाडा लॉटरी